युवा पत्रकार मुझम्मील काझी राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित

- कोकणातील ज्येष्ठ साहित्यिक इकबाल शर्फ मुकादम यांच्या समवेत स्वीकारला पुरस्कार
रत्नागिरी: पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रभावी कार्याबद्दल रत्नागिरीतील युवा पत्रकार मुझम्मिल काझी यांना नुकतेच राज्यस्तरीय ‘आदर्श पत्रकार पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
‘दिशा महाराष्ट्राची’ या डिजिटल मीडिया संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात माजी पोलीस अधिकारी, ॲडव्होकेट आणि पत्रकार श्री. विशाल माने यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी कोकणातील ज्येष्ठ साहित्यिक इकबाल शर्फ मुकादम यांच्या उपस्थितीत पुरस्कार स्वीकारण्याचा मान मुझम्मिल काझी यांना मिळाला. पत्रकारितेत सतत निष्ठा, अभ्यासू वृत्ती आणि सामाजिक भान जपणाऱ्या मुझम्मिल काझी यांचा हा चौथा राज्यस्तरीय पुरस्कार आहे, ज्यामुळे त्यांच्या कार्याला पुन्हा एकदा नवी ओळख मिळाली आहे.
गेल्या आठ वर्षांपासून मुझम्मिल काझी यांनी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करत कोकणातील ग्रामीण भागातील अनेक प्रश्न, स्थानिक समस्या आणि प्रशासकीय कामकाजातील त्रुटी परखडपणे मांडल्या आहेत. त्यांनी तळागाळातील नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडत अनेक वेळा प्रशासनाला दखल घेण्यास भाग पाडले आहे. विविध युट्यूब चॅनेलमध्ये यशस्वीपणे जबाबदारी पार पाडल्यानंतर त्यांनी ‘ग्रामीण वार्ता’ या न्यूज डिजिटल मीडियाची सुरुवात केली. ‘ग्रामीण वार्ता’ च्या माध्यमातून त्यांनी आजवर अनेक समस्या मांडून गरजू लोकांना न्याय मिळवून दिला आहे. या प्रवासात त्यांच्या अनेक सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे. डिजिटल माध्यमातील त्यांच्या योगदानामुळेच त्यांची ‘मराठी पत्रकार परिषद डिजिटल मीडिया’ या संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा सचिवपदी निवड झाली आहे.
त्यांनी गावकुसाबाहेर फारसा न पोहोचणारा आवाज डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून राज्याभर पोहोचवला. त्यांच्या पत्रकारितेची गाथा सामाजिक भान, अभ्यासू दृष्टिकोन आणि पत्रकारितेतील निष्ठा या तीन आधारस्तंभांवर उभी राहिली आहे. याच गुणांमुळे त्यांच्या कार्याची दखल राज्यस्तरीय व्यासपीठावर घेतली गेली आहे.
या वेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप, संगीता जगताप, महेंद्र चाफे, ॲड. पूजा कांबळे, ‘दिशा महाराष्ट्राची’ डिजिटल मीडियाचे संपादक तुषार नेवरेकर आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
मुझम्मिल काझी यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे, अध्यक्ष उदय गोताड, सर्व पदाधिकारी, मित्र परिवार आणि हितचिंतकांनी त्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.