ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हलशिक्षण

रघुवीर घाटात पुन्हा दरड कोसळली ; शाळकरी विद्यार्थी तीन तास बसमध्ये अडकले!

  • सार्वजनिक बांधकाम खात्याने दरड हटवल्यावर वाहतूक सुरू

खेड ( रत्नागिरी) : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडला सातारा जिल्ह्याशी जोडणाऱ्या तसेच पर्यटकांची पसंती असलेल्या रघुवीर घाटात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा दरड कोसळली. या घटनेमुळे दरड कोसळलेल्या ठिकाणाहून खोपी येथील शाळेत गुरुवारी सकाळी एसटी बसने येणारे विद्यार्थी तीन तास अडकून पडले.

रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांचा दुवा समजला जाणाऱ्या रघुवीर घाटात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास चार दिवसात दुसऱ्यांदा दरड रस्त्यावर आली. दरडीतील भली मोठी शिळा रस्त्यावर येऊन पडल्याने काही तासांसाठी रघुवीर घाट मार्गे होणारी वाहतूक खंडित झाली.

रघुवीर घाटात दरड कोसळल्याची माहिती युवा सेनेचे खेडमधील कांदाटी विभाग संघटक (शिंदे गट) भूषण मोरे यांनी तातडीने संबंधित यंत्रणांना दिली. श्री मोरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते विक्की भोसले, संदीप कदम यांनी ही दरड हटवून रस्ता मोकळा करण्यात शासकीय यंत्रणांना सहकार्य केले.

रघुवीर घाटात दरड कोसळल्यामुळे घाटात अडकून पडलेली एसटी बस.

दरड कोसळल्यामुळे गुरुवारी दि.३ रोजी सकाळी अकल्पे येथून खेडकडे येणारी एसटी बस घाटातच अडकून पडली होती. या बसमध्ये खेड तालुक्यातील खोपी येथील शाळेत जाणारे विद्यार्थीही होते. या विद्यार्थ्यांना तब्बल तीन तास बसमध्ये अडकून राहावं लागलं.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून दरड हटवण्याचे काम सुरू केले. गुरुवारी दुपारी 11 वाजण्याच्या सुमारास दरड हटवण्यात आल्यावर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button