रत्नागिरीची गाडी मुंबईबाहेर काढली ; रेल्वेतील ‘हिंदी बाबू’ पडले महाराष्ट्राला भारी!
मुंबई : जवळपास 23-24 वर्षे दादर ते रत्नागिरी मार्गावर सुरू असलेली पॅसेंजर गाडी महाराष्ट्राच्या राजधानीतून बाहेर काढून त्या जागी दादर येथून गोरखपुरसाठी विशेष ट्रेन चालवणाऱ्या रेल्वेतील ‘हिंदी बाबू’ महाराष्ट्रातील मराठी नेत्यांना भारी पडले आहेत. कोरोनाच्या नावाखाली गेल्या दोन दशकांपापेक्षा अधिक काळ दादर येथून रत्नागिरीसाठी सुटणारी ही गाडी रेल्वे राज्यमंत्री असताना रावसाहेब दानवे यांनी अधिकाऱ्यांना सूचना करूनही रेल्वेतील हिंदी बाबूंनी त्याला केराची टोपली दाखवली आहे. याच कारणामुळे आजही ही गाडी दादर ऐवजी दिव्यावरूनच रत्नागिरीसाठी माघारी पाठवली जात आहे.
१९९६-९७ पासून रत्नागिरी लो. टिळक टर्मिनस मार्गावर एक पॅसेंजर गाडी सुरु झाली. पुढे प्रवाशांच्या मागणीनुसार ती रत्नागिरी दादर पॅसेंजर म्हणून चालवली जाऊ लागली. मार्च २०२० पर्यंत ही गाडी प्रवाशांच्या सेवेत होती. दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, उत्तर मुंबई, वसई, नालासोपारा, विरार आणि गुजरात दिशेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दादर स्थानक सोयीचे असल्यामुळे आणि दिव्यापुढे सर्व स्थानकांवर थांबत असल्यामुळे ही गाडी सर्वाधिक लोकप्रिय होती.
दरम्यान, कोरोनाच्या नावाखाली मध्य रेल्वेने सप्टेंबर २०२१ पासून ही गाडी महामारीची तीव्रता कमी झाल्यावर सुरु करताना मार्गाची क्षमता नसल्याचे आणि वक्तशीरपणाचे कारण देत बंद केली व नवीन शून्य आधारित वेळापत्रकात दिवा रत्नागिरी पॅसेंजर म्हणून सुरु केली. परंतु, आजही रत्नागिरी पॅसेंजरच्या वक्तशीरपणात काहीही बदल झालेला नाही. उलट, पूर्वी दादरवरून येत असताना तेथेच गाडीत पाणी भरले जात असल्यामुळे ही गाडी पनवेलहून थेट रत्नागिरीसाठी निघू शकत होती, परंतु आता दिव्यात तशी सोय नसल्यामुळे येता-जाता दोन्ही वेळेस पनवेलला १० ते २० मिनिटे वाया जातात. यामुळे मागील गाड्या पुढे काढाव्या लागतात; ज्यात आणखी अर्धा तास वाया जातो व गाडीला आणखी उशीर होतो. त्यामुळे गाडी दादरहून दिव्याला नेल्यामुळे वक्तशीरपणा तर सुधारला नाहीच, उलट प्रवाशांच्या त्रासात भर पडली.
याच शून्य आधारित वेळापत्रकात मुंबई कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस, भुसावळ मुंबई पॅसेंजर, पुणे कर्जत पनवेल पॅसेंजर, मनमाड मुंबई गोदावरी एक्सप्रेस अशा महाराष्ट्राच्या राज्यांतर्गत व इंटरसिटी गाड्या निवडून निवडून बंद करण्यात आल्या.
दिवा दादर मार्गाची क्षमता नसल्याचे कारण देणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाने त्याच मार्गावर ०१०२७/०१०२८ दादर गोरखपूर (चार दिवस) आणि ०१०२५/०१०२६ दादर बालिया (तीन दिवस) विशेष गाड्या (दैनिक) सुरु केल्या. १ जानेवारी, २०२५ पासून लागू झालेल्या Trains At A Glance 2025 या नवीन वेळापत्रकात TOD Special म्हणून या गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. याचाच अर्थ या गाड्या आता कायमस्वरूपी झाल्या आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून कोकणातील सर्व नागरिकांनी विविध माध्यमांतून रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे दादर रत्नागिरी पॅसेंजर सुरु करण्याची मागणी केली होती. तसेच सकाळच्या वेळेत दादर चिपळूण फास्ट पॅसेंजर सुरु करण्याची मागणी मागील 10 ते 15 वर्षांपासून करण्यात येत आहे. परंतु त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. वारंवार लोकप्रतिनिधींनी थेट रेल्वे मंत्र्यांकडे मागणी करूनही काहीही उपयोग झाला नाही. मार्च 2023 मध्ये तत्कालीन रेल्वे राज्य मंत्री श्री. रावसाहेब दानवे यांनीही रेल्वे प्रशासनाला याबाबत सूचना दिल्या होत्या. परंतु, त्यालाही मध्य रेल्वेने नकार दिला.
कोकण रेल्वे मार्गावर महाराष्ट्रासाठी आधीच गाड्यांची कमतरता असताना सेवेत असणार्या गाड्यांची अशी विल्हेवाट लावून प्रवाशांना त्रास देण्याच्या वृत्तीचा आम्ही निषेध करीत आहोत. रेल्वे प्रशासनाने नवीन गाड्यांच्या बाबतीत प्रयोग करावेत, पण पूर्वापार चालत असलेल्या गाड्या मुंबई बाहेर नेऊ नयेत. इतर राज्यांत जाणार्या गाड्यांना विरोध करण्याची आमची मानसिकता नाही. परंतु महाराष्ट्रातील रत्नागिरीची गाडी मुंबईबाहेर फेकून त्या जागी गोरखपूरची गाडी सुरु करणे म्हणजे महाराष्ट्रातील जनतेला थेट आव्हान देण्यासारखे आहे. याला आमचा ठाम विरोध असेल, असे अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने म्हटले आहे.
रेल्वे प्रकल्पांमध्ये राज्य शासनांचाही आर्थिक सहभाग असल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री व संबंधित आमदारांनाही याकामी जोरकस मागणी करणे आवश्यक आहे. तरी, संबंधितांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर 50104/50103 रत्नागिरी दादर पॅसेंजर कोरोनापूर्वीप्रमाणे पूर्ववत सुरु करावी, अशी मागणी समितीने लावून धरली आहे.
अद्यापही मध्य रेल्वे महाराष्ट्राची ही गाडी मार्गाच्या क्षमतेचे कारण सांगून मुंबई शहरात घेत नसताना त्याच मार्गावरून गोरखपूर गाडी सुरु करते हे आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. रत्नागिरी पॅसेंजरसाठी मार्गाची क्षमता नसेल तर गोरखपूर गाडीसाठी मार्ग कसा मोकळा होतो हे आम्हाला न सुटलेले कोडे आहे.-अक्षय सरोज मधुकर महापदी
सचिव, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्