रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत न्यूजमेकर्स ॲचिव्हर्स पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी : जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना ‘न्यूजमेकर्स ॲचिव्हर्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराने अधिक काम करण्याची उमेद आणि ऊर्जा मिळते, असे सामंत यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला उद्योगाचा दर्जा मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
मराठी चित्रपटसृष्टीला उद्योगाचा दर्जा
उदय सामंत म्हणाले, “मराठी चित्रपटसृष्टीला उद्योगाचा दर्जा मिळावा ही कित्येक वर्षांपासूनची मागणी होती. ती आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पूर्ण झाली आहे. याचा मला विशेष आनंद आहे.”
‘वेव्हज्-२०२५’ द्वारे मनोरंजनात महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावर
‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड इंटरटेनमेंट समिट’ (वेव्हज्-२०२५) च्या माध्यमातून महाराष्ट्र मनोरंजनाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचत आहे, असेही सामंत यांनी नमूद केले.
मराठी साहित्याच्या अनुवादासाठी अकादमी
मराठी साहित्याचा इतर भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने अकादमी स्थापन करण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतला आहे, असेही सामंत यांनी सांगितले.
या अकादमीमुळे मराठी साहित्य, चित्रपट आणि नाटकांच्या संहिता इतर भाषांमध्ये अनुवादित करणे सोपे होईल आणि साहित्यिकांना त्यासाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार
“आज मी मंत्री म्हणून काम करतो, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत,” अशी भावना उदय सामंत यांनी व्यक्त केली.
पुरस्कार सोहळ्यातील मान्यवर
या सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख श्री. राम लाल जी, राज्यमंत्री योगेश कदम, ख्यातनाम गायिका उषा मंगेशकर, ज्येष्ठ साहित्यिक ज.वि.पवार, ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर, अनु अग्रवाल आणि झिला बाई वसावे उपस्थित होते. या मान्यवरांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.