रत्नागिरीच्या पतीत पावन मंदिरात भजनीबुवांना रोखले

रत्नागिरी : जे मंदिर स्वातंत्र्यपूर्व काळात स्पृश्य अस्पृश्यतेचा कलंक पुसण्यासाठी हिंदू धर्मातील सर्वांना दर्शनासाठी खुले करण्यात आले त्याच रत्नागिरीतील पतीत पावन मंदिरात भजनी बुवांना रोखण्याचा प्रकार घडला आहे. हे प्रकरण पोलिसात गेले असून संबंधितांवर कारवाईची मागणी भजनी बुवांकडून करण्यात आली आहे.
दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात स्वखर्चाने जमीन खरेदी करून बांधले. स्पृश्य – अस्पृश्यतेचा तत्कालीन समाज व्यवस्थेला लागलेला कलंक पुसण्यासाठी हिंदू धर्मातील सर्वांना दर्शन घेण्याकरता खुले करण्यात आले होते. त्याच पतित पावन मंदिरात रत्नागिरीतील भजनी बुवांना हे मंदिर आमचे आहे, असे सांगून भजन करण्यापासून रोखण्यात आले. वास्तविक या संदर्भात महिनाभर आधीच पत्र देण्यात आले होते. असे असतानाही वयोवृद्ध भजनीबुवांना मंदिरात भजन सेवा करण्यापासून रोखण्यात आले आहे.
या प्रकरणी रत्नागिरीतील बहुजन समाजातील वयोवृद्ध भजनीबुवांनी येथील पोलिसांकडे रितसर तक्रार केली आहे.