रत्नागिरीच्या प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. तोरल शिंदे यांना मानाचा आयएसएआर पुरस्कार
- ग्रामीण भागातील वंध्यत्वावर काम केल्याची दखल घेऊन केला सन्मान
रत्नागिरी : कोकणातील वंध्यत्व या मोठ्या समस्येवर काम करण्यासाठी सर्वात पहिले पावूल उचललेल्या रत्नागिरीतील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. तोरल निलेश शिंदे यांना Indian Society for Assisted Reproduction या संस्थेचा मानाचा पुरस्कार घोषित झाला आहे.
कोकणामध्ये वंध्यत्वाचे प्रमाण अधिक आहे. त्याला अनेक सामाजिकसह अनेक कारणे आहेत. या समस्येवर मात करताना मोठ्या शहरांमध्ये जाऊन यावर उपचार घेणे अनेक पती पत्नींना शक्य नसल्याने अनेक दांपत्य विना अपत्य जीवन जगत होते. मुंबई येथून स्त्री रोग तज्ञाचे शिक्षण घेऊन रत्नागिरीत आलेल्या डॉ. तोरल शिंदे यांना स्त्रियांवर उपचार करताना ही समस्या अधिक जाणवली. यावर मात करून येथील महिलांना मातृत्वाचा आनंद देण्याचा निर्धार करत डॉ. तोरल यांनी याचे विशेष शिक्षण घेतले आणि २०१४ मध्ये रत्नागिरीत कोकणातील पहिले रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुरु केले.
स्वतः उत्तम स्त्री रोग तज्ञ असलेल्या डॉ. तोरल यांनी गेल्या 9 वर्षात रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून सुरू केलेलेया कामातून सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे. ग्रामीण भागातील महिला चौकटी मोडून उपचारासाठी पुढे येऊ लागल्या आहेत. आजवर अनेक दाम्पत्यांच्या चेहऱ्यावर डॉ. तोरल यांच्यामुळे समाधान आणि आनंद दिसला आहे.
डॉ. तोरल यांच्या या ग्रामीण भागातील कामाची दखल Indian Society for Assisted Reproduction या संस्थेने घेतली असून त्यांचा ISAR पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा २६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता कोल्हापूर येथे होणार आहे. या सन्मानाबाबत डॉ. तोरल यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.