रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महविद्यालय व रुग्णालयात पहिले देहदान
रत्नागिरी : दिगंबर साठे यांचे रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी पहाटे 1.30 वाजण्याच्या सुमारास उपचारा दरम्यान शासकीय रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महविद्यालयामधील शरीररचना शास्त्र विभागात त्यांची पत्नी स्नेहल साठे व मुलगी छाया साठे यांनी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी उपयोग व्हावा या इच्छेने दिवंगत साठे यांचा देह दान केला.
दिवंगत दिगंबर लक्ष्मण साठे, वय – 65 वर्ष, राहणार – पऱ्याची आळी यांच्या पत्नी स्नेहल साठे व त्यांची मुलगी छाया साठे यांनी 18 डिसेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महविद्यालयात येऊन देहदानाचा संकल्प केला होता.
देहदानाचे महत्व : शरीररचना शास्त्र विभागामध्ये आलेल्या देहाचा उपयोग वैद्यकीय शिक्षण तसेच संशोधन यासाठी केला जातो. या संपूर्ण प्रकियेमध्ये शासकीय वैद्यकीय महविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचना शास्त्र विभाग प्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधिक्षक रेशम जाधव व विभागातील कर्मचारी यांनी देहदान व त्यानंतरची प्रकिया पूर्ण केली. तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर यांचे देखील सहकार्य मिळाले.
अधिष्ठाता डॉ. रामानंद व डॉ. सय्यद यांनी देहदान संकल्प करण्याबाबत नागरिकांना आवाहन केले आहे.