रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुडघ्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे येथील एका रुग्णावर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुडघ्याची गुंतागुंतीची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
श्री. रोहित रमाकांत मेणे (वय – ३० वर्षे, राहणार – नांदिवडे,जयगड ,रत्नागिरी यांना गेले दीड वर्षापासून उजव्या पायाच्या गुडघ्याची शिर आणि गादी तुटल्यामुळे गुडघे दुखीचा त्रास होता तसेच गुडघा अडकलेला असल्याने सरळ करता येणे शक्य नव्हते शिवाय चालताना तोल जाऊन लंगडत चालावे लागत होते. ही शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयात करणे खर्चिक असल्याने सदर रुग्ण हे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी येथे उपचाराकरिता दाखल झाले.
दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी शासकीय रुग्णालयातील अस्थिरोग तज्ञ डॉ. निखिल देवकर यांनी रोहित मेने यांच्या उजव्या गुढघ्याची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया ( Arhtroscopic ACL Reconstruction ) यशस्वीरित्या केली. सदर शस्त्रक्रियेमुळे अडकलेला गुडघा पूर्ववत झाला असून तोल न जाता चालणे शक्य झाले आहे.
दुर्बिणीद्वारे केली जाणारी अवघड व खर्चिक अशी शस्त्रक्रिया जी मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरात केली जाते ती शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी येथे यशस्वीरित्या करण्यात आली. त्याबद्दल शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी चे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुतार, अस्थिरोग तज्ञ डॉ. निखिल देवकर, भूलतज्ञ डॉ. मंगला चव्हाण तसेच कर्मचारी यांचे रोहित मेने व त्यांच्या कुटुंबाने आभार मानले व मिळालेल्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.