रत्नागिरीच्या सहा विद्यार्थ्यांची संगमनेरमधील राज्यस्तरीय योगा स्पर्धेसाठी निवड

- जिल्हा योगा क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत विद्यार्थ्यांची बाजी
रत्नागिरी : रत्नागिरी योगासना स्पोर्ट्स असोसिएशन आणि महाराष्ट्र स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खेड येथे घेण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हा योगा क्रीडा अजिंक्यपद २०२५-२६ या जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी झालेल्या रत्नागिरी तालुक्यातील २० विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यात रत्नागिरीतील जी. जी. पी. एस. व शिर्के प्रशालेतील सहा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे.

सौम्या मुकादम, समर्थ कोरगावकर, तृष्णा शिरधनकर, राधिका पेडणेकर, प्रतीक पुजारी, रत्नेश आडिवरेकर या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत आपला राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश निश्चित केला.
ही स्पर्धा वेगवेगळ्या १२ प्रकारांमध्ये खेळली गेली. ट्रॅडिशनल योगासह या स्पर्धेमध्ये फॉरवर्ड बेंड, बॅकवर्ड बेंड, सुपाईन, ट्विस्टिंग, लेग बॅलन्स, हँड बॅलन्स, आर्टिस्टिक योगा, रिदमिक योगा या प्रकारांचा त्यात समावेश होता. गेले काही महिने राष्ट्रीय खेळाडू व शिव योगा क्लासेसचे दुर्वांकुर चाळके हे या मुलांना विशेष प्रशिक्षण देत आहेत. तसेच योगा शिक्षक श्रद्धा जोशी व किरण सनगरे हे दोघेही या मुलांवर मेहनत घेत आहेत. स्पर्धेसाठी लागणारे तंत्र, गुण मिळवून देणाऱ्या बाबी, बिनचूक सादरीकरण अशा सर्व बाजूंनी मुलांना प्रशिक्षित केले जात आहे.
विद्यार्थ्यांना मोठी संधी
राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यास या विद्यार्थ्यांना पुढे खेलो इंडिया आणि आशियायी स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.
या स्पर्धेत रत्नागिरीतील हर्षदा धाडवे, सोहम बंडबे, वंश शिंदे, आदिती चव्हाण, श्रेया तारे, सान्वी तारे, अपूर्वा मुसळे, श्रावणी देसाई, पवित्रा पाडावे, विराज रहाटे, विनायक डांगे, अर्णव कदम, रुद खर्डे, आराध्या तांबे या मुलांनीही भाग घेऊन वेगवेगळी पारितोषिके पटकावली आहेत.
या स्पर्धेची राज्यस्तरीय फेरी १५ ते १८ ऑगस्टला संगमनेर येथे होणार आहे. जिल्हास्तरावर प्रत्येक प्रकारात प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्याची राज्यस्तरासाठी निवड होते. त्यानुसार आता रत्नागिरीचे सहा विद्यार्थी राज्यस्तरावर सहभागी होणार आहेत.