रत्नागिरीत भगवती किल्ल्यावरून समुद्रात पडून बेपत्ता झालेल्या तरुणीच्या मित्रावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : येथील भगवती किल्ल्यावरून समुद्रात पडून बेपत्ता झालेल्या झालेल्या तरुणीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
चार दिवसापूर्वी मूळच्या हरियाणा राज्यातील असलेली सुखप्रीत धारीवाल (25) ही बँकिंग सेवेत असलेली तरुणी भगवती किल्ल्यावरून समुद्रात पडून बेपत्ता झाली आहे. दरम्यान रत्नागिरी येथे समुद्रात पडून बेपत्ता झालेल्या तरुणीचे वर्णन याच दरम्यान नाशिकमधून बेपत्ता झालेल्या तरुणीशी जुळल्यामुळे तिच्या नातेवाईकांना पोलिसांनी रत्नागिरीत बोलावले होते. त्यानुसार या तरुणीचे वडील आणि भाऊ यांनी घटनास्थळी आढळून आलेल्या चप्पल तसेच ओढणी या वस्तू नाशिकमधून बेपत्ता झालेल्या सुखप्रीतच्या असल्याचे ओळखले.
दरम्यान या प्रकरणी समुद्रात बेपत्ता झालेल्या तरुणीचा शोध ड्रोनच्या साह्याने सुरू ठेवला आहे. या प्रकरणी सुखप्रीत हिच्या संपर्कात असलेला तिचा मित्र सध्या संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
या संदर्भात सुखप्रीत हिच्या वडिलांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी जस्मिक केहरसिंग (29, मूळचा राहणार फतेहबाद, हरियाणा. सध्या राहणार रत्नागिरी) याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो देखील बँकिंग क्षेत्रात कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे. याआधी प्रशिक्षणादरम्यान या दोघांची ओळख झाली होती, अशी माहिती समोर आली आहे.