रत्नागिरीत राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदाता दिनानिमित्त जनजागृती रॅली
रत्नागिरी, दि. 3 : १ ऑक्टोबर हा राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदाता दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने येथील शासकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय, रक्तपेढीच्यावतीने राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिवसाचे औचित्य साधून जनजागृत्ती रॅली काढण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, कोस्टल गार्ड कमांडिंग ऑफिसर ललित बुडापोटी, मनोरुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ.संघमित्रा फुले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कुमरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. विनोद सांगवीकर , निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाठ, शल्यचिकीत्सक डॉ. विटेकर, स्काउट गाइडचे जिल्हा संघटक, स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक अरुण कुमार जैन, डॉ.कांबळे तसेच यश फॉइंडेशन नर्सिंग कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थी, शिर्के हायस्कूल चे प्राध्यापक, स्कॉउट गाइडचे विद्यार्थी उपस्थित होते.
दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. सुतार यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना रक्तपेढी केंद्राच्या कामाचे स्वरूप व वार्षिक रक्त संकलन आणि रक्त पुरवठा यांचे विवरण सादर केले. या रक्तपेढी केंद्रामार्फत ९०% रुग्णांना वार्षिक रक्तपुरवठा मोफत केला जातो. रक्तविघटन केंद्राची माहिती सर्वाना सोप्या पद्धतीने सांगितली. रक्तदानचे फायदे सांगून रक्तदात्यांमधील भीती व शंका दूर केल्या. त्यानंतर रक्तदान संदर्भात सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांनी रक्तदान शपथ घेतली.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये जि. प. रत्नागिरी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पुजार यांनी रक्तदान करण्यास आवाहन केले. मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅली ला सुरुवात करण्यात आली. या रॅलीत रूग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, नर्सिंग कॉलेज विद्यार्थी, आशासेविका, स्टेट बँकेचे अधिकारी, सर्वच शासकीय विभागातील कर्मचारी, इतर महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या, नर्सिंग कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी रक्तदान संदर्भात बस स्थानकावर जनजागृती पर पथनाट्य सादर केले. शिर्के हायस्कूलच्या स्काउट गाईड विद्यार्थ्यांचे ढोल पथक रॅली चे विशेष आकर्षण ठरले. रॅली दरम्यान रक्तदान संदर्भात आवाहन केले गेले.
कार्यक्रमाची संगता करताना विनोद पावरा (रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी ) यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न करणारे रक्तपेढीतील अधिकारी कर्मचारी, व रॅली त सहभागी झालेले सर्व विद्यार्थी मान्यवरांचे आभार मानले.