रत्नागिरीत लक्ष्मीपूजन दिनी पाऊस ; दिवाळीच्या उत्साहावर पाणी!

रत्नागिरी: परतीच्या पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली असे वाटत असतानाच ऐन दिवाळीच्या सणात, मंगळवारी (लक्ष्मीपूजनाच्या दिवशी) सायंकाळी रत्नागिरी शहर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळी लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू असतानाच आलेल्या या पावसामुळे बाजारात फटाक्यांची दुकाने लावून बसलेल्या व्यावसायिकांची चांगलीच धावपळ उडाली.
परतीच्या पावसाचा ‘यू टर्न’
यंदा नवरात्र उत्सवासह दसऱ्यापर्यंत पावसाने आपली उपस्थिती कायम ठेवली होती. पाऊस आता परतीला लागला असून, परतीचा पाऊसही आता संपणार, असे अंदाज वर्तवले जात असतानाच, दिवाळीतील महत्त्वाचा दिवस असलेल्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वातावरणात अचानक बदल झाला. दुपारच्या उन्हाची जागा दाटून आलेल्या ढगांनी घेतली. सायंकाळी ५:३० वाजल्यानंतर सुरू झालेल्या या पावसाने सव्वा सहा वाजले तरी थांबण्याचे नाव घेतले नाही.
खरेदी आणि फटाके फोडण्याच्या आनंदावर विरजण!
या अचानक आलेल्या पावसामुळे बाजारात दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेले नागरिक, तसेच फटाके विक्रेते आणि दिवाळीचे फटाके फोडण्यात मग्न असलेल्या बच्चे कंपनीच्या उत्साहावर अक्षरशः विरजण पडले. दिवाळीतील महत्त्वाच्या दिवशी आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आणि शहरातील वातावरण अचानक बदलून गेले.