रत्नागिरीत सिव्हिल ते जयस्तंभ मार्ग शुक्रवारी पूर्णत: बंद राहणार!
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणाऱ्या गर्दीमुळे वाहतुकीचे नियमन
रत्नागिरी, दि. ५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 5 डिसेंबर रोजी रात्री 22 वा. ते 6 डिसेंबर रोजी रात्री 22 या कालावधीत शासकीय रुग्णालय ते जयस्तंभ या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येत आहे. तसेच पर्यायी मार्ग म्हणून जेल रोड, जीजीपीएस हायस्कूल- गिताभवन मार्गे जयस्तंभ व तेथून एस.टी. स्टॅण्ड या पर्यायी मार्गे वाहतूक वळविण्यात यावी, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आज दिले आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी सिव्हील हॉस्पिटल रत्नागिरी समोर मोठ्या प्रमाणात अनुयायी एकत्र जमणार आहेत. अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुयायींची गर्दी होण्याची शक्यता असून, अशावेळी पार्किंगचा प्रश्न निर्माण होवू शकतो अगर वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 115 व 116 अन्वये 5 डिसेंबर रोजी रात्री 22 वा. ते 6 डिसेंबर रोजी रात्री 22 वा. या कालावधीत शासकीय रुग्णालय ते जयस्तंभ या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येत आहे. तसेच पर्यायी मार्ग म्हणून जेल रोड, जीजीपीएस हायस्कुल- गिताभवन मार्गे जयस्तंभ व तेथून एस.टी. स्टॅण्ड या पर्यायी मार्गे वाहतूक वळविण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.
वाहतुकीची कोंडी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता योग्य नियोजन करण्यात यावे. वाहतुक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारण्याची कार्यवाही पोलीस विभागाने करावयाची आहे, असेही आदेशात म्हटले आहे.