रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये फातिमा शेख यांची प्रतिमा लावा : मुझम्मील काझी

- रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या सर्व शाळांत फातिमा शेख यांची प्रतिमा लावण्यात यावी अशी मागणी गाव विकास समितीचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष मुझम्मील काझी यांनी केली आहे.
गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड,संघटन प्रमुख सुहास खंडागळे,उपाध्यक्ष राहुल यादव,मंगेश धावडे, सरचिटणीस मंगेश कांगणे,जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुझम्मील काझी यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे सदर मागणी केली आहे.
मुझम्मील काझी यांनी निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी असणाऱ्या फातिमा शेख यांचा फोटो लावण्याबाबत आपण आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा अशी आमची आपणाकडे या पत्राद्वारे विनंती आहे. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यामुळे सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली. फुले दांपत्याला शिक्षण क्षेत्रात सहकार्य करणाऱ्या व सावित्रीबाई फुले यांच्याप्रमाणेच त्यांच्यासोबत शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या फातिमा शेख यांचे कार्य कर्तृत्व नव्या पिढीला माहीत व्हावे यासाठी इतर महापुरुषांप्रमाणेच फातिमा शेख यांचा फोटो देखील मराठी शाळांमध्ये लावण्याबाबत निर्णय व्हावा अशी आपणाकडे विनंती आहे.
तसेच मुझम्मील काझी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की,फातिमा शेख या पहिल्या मुस्लिम शिक्षिका आहेत. आमची हीच मागणी आहे की, आजच्या पिढीला फातिमा शेख यांचा इतिहास तसेच त्यांचे कार्य माहीत नाही आहे. ते विद्यार्थ्यांना कळावे यासाठी फातिमा शेख यांची प्रतिमा लावण्यात यावी तसेच त्यांची जयंती आणि पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात यावी असेही काझी यांनी म्हटले आहे.