रत्नागिरी जिल्ह्यात उद्या महसूल सप्ताहाचा शुभारंभ
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नियोजनाचा आढावा
रत्नागिरी, दि.३१ : उद्यापासून सुरु होणाऱ्या महसूल सप्ताहाचा शुभारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत अल्पबचत भवन येथे दुपारी 12 वाजता होणार आहे. या महसूल सप्ताहाच्या नियोजनाचा आढावा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज घेतला. प्रलंबित विषय प्राधान्याने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीला अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, परिविक्षाधीन आयएएस जास्मीन, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, तहसीलदार तेजस्वीनी पाटील, तहसीलदार राजाराम म्हात्रे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी तहसीलनिहाय आढावा घेतला. ते म्हणाले, गावांमध्ये फलक प्रदर्शित करुन सप्ताहात होणाऱ्या उपक्रमांची जनजागृती करा. सातबाऱ्यावर महिलांची नावे लावण्यात यावीत, आरोग्य तपासणी शिबीर, डोळे तपासणी शिबिर आदीचे नियोजन करावे. युवा संवाद कार्यक्रम अंतर्गत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यक्रम घ्यावेत. महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १५५ खालील प्रकरणे तलाठयांमार्फत ई हक्क पोर्टलवर सेतू सुविधा केंद्रामार्फत नोंदवून तहसीलदारांकडे पाठविणे, स्मशानभूमी दफनभूमी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असणारे दाखले, प्रमाणपत्रे याबाबत प्रलंबित अर्ज निकाली काढावेत. माजी सैनिकांना घरपट्टी माफ झाली पाहिजे त्याबाबत कामकाज करावे.
महसूल सप्ताह शासनाचा प्राधान्यक्रमाचा कार्यक्रम असल्याने सप्ताहाशिवायही हे कामकाज पुढे चालू ठेवावे. यामध्ये सातत्य ठेवा. याची प्रचार प्रसिध्दी जनजागृती करण्याबरोबरच डॉक्युमेंटेशनही करा, असेही ते म्हणाले.
महसूल सप्ताहाच्या पूर्वसंध्येला रांगोळी, रोषणाईने कार्यालये सजले
उद्या 1 ते 7 ऑगस्टपर्यंत जिल्हयात महसूल सप्ताह साजरा होत आहे. याचा शुभारंभ उद्या होणार आहे. या शुभांरभाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, मंडळ कार्यालयाला तिरंगी विजेच्या माळांची रोषणाई केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध योजनांची जनजागृती करणाऱ्या रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. शिवाय फुलांच्या माळा आणि रांगोळीच्या किनारांनी कार्यालय सजवले आहे.