रत्नागिरी जिल्ह्यात दिवाळीसाठी आनंदाचा शिधा वाटप सुरु
रत्नागिरी दि. 3 (जिमाका): दि.19 ऑक्टोबर 2023 च्या शासन परिपत्रकानुसार दिवाळी सणासाठी राज्यातील लाभार्थ्यांना 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलोच्या प्रमाणात रवा, चणा डाळ, मैदा व पोहे 100 रुपयामध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गुहागर व राजापूर तालुक्यात काल पहिल्याच दिवशी सुमारे साडेचारशे लाभार्थ्यांनी दिवाळी गोड करण्यासाठी आनंदाचा शिधा घेतला आहे.
जिल्ह्यातील 2 लाख 53 हजार 144 लाभार्थ्यांसाठी जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून मागणी करण्यात आली असून रवा, साखर, चणाडाळ, पोहे, मैदा सर्व गोदामात पोहोच झाले आहेत. पाली गोदामात खाद्यतेल अद्याप शासनाकडून प्राप्त नाही. तसेच मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, रत्नागिरी व पाली गोदामात पिशव्या पोहोच नाहीत. त्या व उर्वरित शिधा जिन्नस २ दिवसात सर्व गोदामात पोच होतील, असे ठेकेदारांनी कळविले आहे.
राज्यात अनेक जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात ग्रामपंचायत निवडणुका असल्याने आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी आचारसंहिता असलेल्या क्षेत्रासाठी व आचारसंहिता नसणाऱ्या क्षेत्रासाठी अशा दोन प्रकारच्या पिशव्या शासनाकडून वितरणासाठी प्राप्त होत आहेत.
जिल्ह्यात अद्याप 100 टक्के शिधाजिन्नस प्राप्त झाले नसले, तरी पुढील 2 दिवसात ते प्राप्त होतील व सर्व शिधा पत्रिका धारकांची दिवाळी गोड होईल. यासाठी जिल्हा प्रशासनाने सुट्टीदिवशीही गोदामातून दुकानात आनंदाचा शिधा संच वितरण होईल, याबाबत सूचना दिल्या आहेत.