रत्नागिरी रेल्वे स्थानकाचा ‘लूक’ बदलणार ; एमआयडीसीसोबत सामंजस्य करार
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, एमआयडीसी अधिकाऱ्यांसह कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांची एमओयू प्रसंगी उपस्थिती
रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवासी सुविधांचे अपग्रेडेशन करून रेल्वे स्थानक विकसित करताना स्थानकाला नवा ‘लूक’ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळा सोबत मंगळवारी एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी या सामंजस्य करारा प्रसंगी उपस्थित होते.
कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी रेल्वे स्थानक हे एक महत्त्वाचे मध्यवर्ती रेल्वे स्टेशन आहे. या स्थानकाला नवा लूक देण्यासाठी पावले उचलली जात आहेत. याआधी महाराष्ट्र सरकारने या रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून काही सुशोभन कामे या आधीच सुरू आहेत.
अलीकडेच कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रेल्वे स्थानकावरील सुशोभीकरणाची कामे पूर्णत्वास गेल्यामुळे या स्थानकाला आता नवा लूक प्राप्त झाला आहे.
रत्नागिरी रेल्वे स्थानकावरही विविध प्रवासी सुविधांचे अपग्रेडेशन करण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईत महाराष्ट्र सरकार आणि कोकण रेल्वे यांच्यात एक सामंजस्य करार झाला आहे.
सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करताना महाराष्ट्र सरकारकडून राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, सीईओ विपिन शर्मा तर कोकण रेल्वेकडून वित्त संचालक आर. एम भडंग, विशेष अधिकारी नागदत्त राव हे उपस्थित होते.