रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उदय बने यांची निवडणूक रिंगणातून माघार
बाळ माने यांच्या विजयाचा मार्ग सुकर
रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मोठी घडामोड घडली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते उदय बने यांनी दुपारी १ वाजून ३६ मिनीटांनी आपला निवडणूक अर्ज मागे घेतला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उद्या होणाऱ्या सभेपूर्वीची ही मोठी घडामोड असून यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जल्लोषी वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे उबाठा पक्षाची ताकद अधिकच वाढली आहे.
माजी जि. प. उपाध्यक्ष, ४५ वर्षे शिवसेनेत कार्यरत असणारे उदय बने हे मुरब्बी नेते आहेत. त्यांनी अर्ज भरल्यामुळे निवडणुकीत ट्वीस्ट निर्माण झाला होता. परंतु पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारपूर्वक माजी आमदार बाळ माने यांना तिकीट दिले. उदय बने यांच्याशीही चर्चा झाली होती. दीपावलीनिमित्तही बाळ माने व शिवसेनेतील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी उदय बने यांच्याशी सकारात्मक चर्चा केली होती. त्यामुळेच श्री. बने यांनी आज दुपारी माघार घेतली आणि आता ते बाळ माने यांच्या प्रचाराला लागतील. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फौज आहे व ते माने यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहेत.
शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे प्रचार यंत्रणा जोमाने काम करून लागली आहे. विशेष म्हणजे उद्या ५ नोव्हेंबरला संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत साळवी स्टॉप येथील जलतरण तलाव येथील मैदानावर पक्षप्रमुखांची विराट सभा होणार आहे. त्यामुळे रत्नागिरीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.