रत्नागिरी विमानतळावरून लवकरच उड्डाण!
कोल्हापूरसह रत्नागिरी विमानतळासाठी ६२ कोटी ७६ लाखांचा निधी अदा
मुंबई : राज्यातील उद्योगांना चालना देण्याबरोबरच पर्यटनाला चालना देण्यासाठी नवीन विमानतळांचा विस्तार करण्याची महत्वाकांक्षी योजना सरकारने आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर आणि रत्नागिरी विमानतळाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला ६२ कोटी ७६ लाख ८५ हजार रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या विमानतळावरून नागरिकांना लवकरच विमानात बसून उड्डाण करणे शक्य होणार आहे. सध्या या विमानतळावरून तटरक्षक दलाची वाहतूक सुरू आहे.
देशातील प्रादेशिक विमानतळ जोडण्याची केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेंतर्गतच्या पहिल्या टप्प्यात रत्नागिरी विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे. हा विमानतळ भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यात ओ. सध्या या विमानतळाची धावपट्टी सुमारे साडेचार हजार फूट लांबीची आहे. देशातील प्रादेशिक विमानतळ जोडल्यानंतर या विमानतळावरून बम्बार्डीयर व एटीआर ७२ प्रकारची विमानांची वाहतूक करण्याच्या दृष्टीने सक्षम करण्याची योजना आहे.
रत्नागिरी विमानतळावरून सुरक्षित नागरी विमान वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने या विमानतळाच्या धावपट्टीची पश्चिमेला मिरजोळे गावातील २५ हेक्टर जमीन राज्य सरकारने विनामोबदला उपलब्ध करून देण्याची विनंती तटरक्षक दलाने राज्य सरकारकडे केली होती. आता रत्नागिरी विमानतळाच्या भूसंपादनासाठी राज्यात विमान कंपनीला २५ कोटी ८४ लाख ९५ हजार रुपयांचा निधी दिला आहे.