महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या साईडपट्ट्या देतायत अपघाताला निमंत्रण!

  • सायंकाळच्या वेळी करावा लागतोय वाहतूक कोंडीचा सामना
  • खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांवर वाहने अर्ध्या रस्त्यात पार्क करण्याची वेळ

रत्नागिरी : काही दिवसांपूर्वीच शहरातील मारुती मंदिर ते माळनाका दरम्यान करण्यात आलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरनानंतर करण्यात आलेल्या साईड पट्ट्यांवर मोठी खडी केवळ पसरवून ठेवल्याने या साईड पट्ट्या अपघातांना निमंत्रण देणाऱ्या ठरत आहेत. साईड पट्ट्यांवर रोड रोलर न फिरवल्याने वाहनचालक खरेदीसाठी जाताना आपली वाहने साईडपट्टीवर उभी करण्याऐवजी अर्ध्या रस्त्यातच उभी करत आहेत.

साईडपट्टीवर केवळ पसरून ठेवलेली खडी

काही दिवसांपूर्वीच जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर ते माळनाका यादरम्यानच्या एका मार्गिकेवर काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर करण्यात आलेली साईडपट्टी पादचाऱ्यांसह वाहनधारकांसाठी देखील डोकेदुखी ठरत आहे. काँक्रिटीकरणाचा रस्ता संपल्यानंतर साईडपट्टी म्हणून बनवण्यात आलेल्या भागात मोठी खडी (की दगड?) अक्षरशः पसरवून ठेवण्यात आले आहेत. यामुळे पादचाऱ्यांना त्यावरून चालणे देखील अवघड बनले आहे. छोट्या वाहनांना तर साईडपट्टीवरून काँक्रीटीकरणाच्या रस्त्यावर वाहने आणणे अवघड झाले आहे.


दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिक दुकानांमध्ये गर्दी करू लागले आहेत. वाहनधारकांना चार चाकी वाहने साईडपट्टीवर उभी करताना देखील कसरत करावी लागत आहे. यामुळे अनेक वाहनचालक हे आपली वाहने तकलादू साईडपट्टीवर नेण्याऐवजी अर्ध्या रस्त्यात उभी करीत आहेत. यामुळे मारुती मंदिर ते माळनाका या काँक्रिटीकरण पूर्ण झालेल्या लेनवर मागील काही दिवसांपासून वाहतुकीची विनाकारण कोंडी होताना दिसत आहे.

खराब साईडपट्टीमुळे नागरिकांना वाहने अशी अर्ध्या रस्त्यात उभी करून दुकानात खरेदीसाठी जावे लागत आहे.

खराब रस्त्याने घेतला दोघांचा जीव!

दोनच दिवसांपूर्वी रत्नागिरी नजीकच्या टीआरपी भागात सुरू असलेल्या मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या  चौपदरीकरण कामामुळे दुचाकी घसरून नाचणे साईनगर भागात राहणाऱ्या दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. याचबरोबर रविवारी सकाळी शहरातील माळनाका येथील मुख्य रस्त्यावर सेवानिवृत्त शिक्षकाला दुचाकीसोबत झालेल्या रस्ता अपघातात प्राणाला मुकावे लागले. या सर्वांचा विचार करता शहरात ठिकठिकाणी सुरू असलेली रस्ता कामे, खराब साईड पट्ट्या, ठेकेदाराचे दुर्लक्ष या बाबी अपघातांना निमंत्रण देणाऱ्या ठरत आहेत.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button