रत्नागिरी-सातारामधील अंतर ७० कि.मी.ने कमी होणार
- पाटण-सातारा नायरी निवळी नेरद घाट सर्व्हेसाठी टीम दाखल
संगमेश्वर : बहुचर्चित असलेल्या आणि संगमेश्वर तालुक्याचे लक्ष लागून रहिलेल्या पाटण-सातारा-नायरी -निवळी-नेरद घाटाच्या सर्वेक्षणासाठी आमदार शेखर निकम व तत्कालीन सरकार यांच्या माध्यमातून ५ कोटींचा निधी सर्वेक्षणासाठी मंजूर झाला असून पुण्यातील एक नामवंत कंपनीने ठेका घेतला आहे. त्या कंपनीचे काही प्रतिनिधी परिसरातील नागरिक व बांधकाम खात्यातील प्रतिनिधी यांनी संयुक्त मिळून नेरद या सह्याद्रीच्या पायथ्याशी जाऊन सर्वे कशा पद्धतीने करता येईल, याची पाहणी केली.यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष येडगे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या घाट रस्त्यामुळे रत्नागिरी तसेच सातारा जिल्ह्यामधील अंतर ७० कि.मी. ने कमी होणार आहे.या नियोजित घाट रस्त्याची पाहणी करताना संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे दीपक इंदुलकर, स्थानिक ग्रामस्थ संतोष सावंत, मुंबईतून खास आलेले जाधव, प्रदीप सोलकर, सुजय पाले, महिंद्र होडे, शांताराम भारती अशोक घाडगे, तानू मालप व इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वेक्षणासाठी शासनाचे लोक येत आहेत हे कळताच परिसरातून आनंद व्यक्त केला जात आहे.