रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाने मानले ना. नितेश राणे यांचे जाहीर आभार!

- सिंधदुर्ग नियोजन सभागृहाला ‘आरमारप्रमुख मायनाक भंडारी’ यांचे नाव देऊन कोकणी जनता, शिवप्रेमींची इच्छा केली पूर्ण
रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नियोजन सभागृहाला स्वराज्याचे पहिले आरमारप्रमुख, अजिंक्य योद्धा मायनाक भंडारी यांचे नाव देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाने राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे जाहीरपणे आभार मानले. गुरुवारी रत्नागिरी दौर्यावर आलेल्या ना. राणे यांना संघाच्या वतीने तसे पत्र देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे आरमार उभे करण्याचे स्वप्न आरमारप्रमुख मायनाक भंडारी यांनी साकार केले. ज्या ब्रिटिशाना फ्रेंच, पोर्तुगीज, डच, हबशी आणि सिद्धी हे कोणीही हरवू शकत नव्हते तेव्हा १९ सप्टेंबर १६६४ रोजी खांदेरीच्या बेटाजवळ भर वादळी वाऱ्यात झालेल्या सागरी लढाईत आरमारप्रमुख मायनाक भंडारी यांनी इंग्रजांचा दारुण पराभव केला होता. अशा पराक्रमी आरमारप्रमुख मायनाक भंडारी यांचे नाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नियोजन सभागृहाला देऊन समस्त कोकणवासीयांचा गौरव आपल्यासारख्या दूरदृष्टीच्या नेत्याने केला अश्या भावना या निवेदनात संघटनेतर्फे व्यक्त करण्यात आल्या आहेत. या निर्णयाने समस्त कोकणवासीय आणि शिवप्रेमींची इच्छा पूर्ण झाली आहे असेही नमूद करण्यात आले आहे.
तसेच, १९ सप्टेंबर हा दिवस देशभरात ‘आरमार विजय दिन’ म्हणून साजरा व्हावा यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंतीदेखील करण्यात आली आहे. यावेळी रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे अध्यक्ष राजीव कीर तसेच रत्नागिरी मांडवी मायनाकवाडी येथील संजय शिवलकर मायनाक, कृष्णकांत मायनाक, प्रशांत मायनाक, अमृता मायनाक, रोहित मायनाक, अंकुल मायनाक, रोहन मायनाक, संदेश मायनाक, किशोर मायनाक, संजय शिवलकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.