राजापूरमध्ये २२ लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त

- उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई!
रत्नागिरी, १५ जुलै २०२५ : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला, गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला आहे. राजापूर बस स्थानकासमोर, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरून गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या एका वाहनातून तब्बल २२ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल पकडण्यात आला. यात ७७ बॉक्स गोवा बनावटीची दारू आणि एका चारचाकी वाहनाचा समावेश आहे.
अशी घडली कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मा. डॉ. श्री. राजेश देशमुख, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई; श्री. प्रसाद सुर्वे, संचालक (अंमलबजावणी व दक्षता); श्री. विजय चिंचाळकर, विभागीय उपायुक्त, कोल्हापूर विभाग आणि श्रीमती किर्ती शेडगे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. राजापूर बस स्थानक समोरील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर पथकाने सापळा रचला. यावेळी हुंडाई कंपनीची पांढऱ्या रंगाची क्रेटा (रजि. नं. एम एच ०७ एएस ३४५८) या वाहनातून मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू अवैधपणे वाहतूक करत असताना आढळली.
जप्त केलेला मुद्देमाल आणि आरोपी:
पथकाने त्वरित कारवाई करत, विविध ब्रँडचे एकूण ७७ बॉक्स (६६५.८ व.लि.) गोवा बनावटीची दारू आणि क्रेटा वाहन असा एकूण २२,१९,७६०/- (बावीस लाख एकोणीस हजार सातशे साठ रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये गोवा दारूची एकूण किंमत ७,१९,७६०/- रुपये आहे. याप्रकरणी गुन्हा रजि. क्र. २११/२०२५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वाहनचालक वस्त्याव सायमन घोन्सालविस, रा. होडावडा ख्रिश्चनवाडी, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ) (ई) व ९० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पथकात यांचा समावेश
श्रीमती किर्ती शेडगे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी आणि श्री. हर्षवर्धन शिंदे, उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अमित पाडळकर, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, रत्नागिरी; दुय्यम निरीक्षक श्री. गणेश जाधव; जवान श्री. वैभव सोनावले; जवान व वाहनचालक श्री. मलिक धोत्रे; जवान श्री. मानस पवार; जवान श्री. सागर टिकार; जवान श्री. निलेश तुपे आणि जवान श्री. विशाल भोसले यांनी ही धडक कारवाई यशस्वी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास श्री. अमित पाडळकर करत आहेत.
अवैध दारूबाबत माहिती देण्याचे आवाहन:
जिल्ह्यात कुठेही हातभट्टी दारूची निर्मिती, विक्री, परराज्यातील अवैध दारूची वाहतूक किंवा साठा, बनावट माडी विक्री होत असल्यास, नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या व्हॉट्सॲप क्र. ८४२२००११३३ किंवा टोल-फ्री क्र. १८००२३३९९९९ वर संपर्क साधण्याचे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागाकडून करण्यात आले आहे. अवैध दारू संदर्भात माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.