महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

राज्यपाल आचार्य देवव्रत यांची संस्कृतमधून शपथभारतीय ज्ञान परंपरेसाठी प्रेरक : संचालक प्रा. दिनकर मराठे

रत्नागिरी, दि. १८ : राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा शपथविधी राजभवनामध्ये पार पडला. विशेष आणि लक्षणीय बाब म्हणजे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली. ही निश्चितच एक अभिमानास्पद बाब आहे. त्यामुळे सर्वात प्रथम कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्यावतीने राज्यपाल आचार्य देवव्रत यांना अभिवादन करतो. संस्कृत भाषेचा असलेला व्यासंग निश्चितच राज्यातील भारतीय ज्ञान परंपरेच्या प्रसारासाठी व विकासासाठी प्रेरक ठरणारा आहे, असे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक दिनकर मराठे यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
याआधीही अनेकदा संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींनी पदाची शपथ संस्कृतमधून घेत संस्कृत भाषेचा यथार्थाने गौरव केलेला आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांना अध्यापनाचा व प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. शिवाय ते संस्कृतचे अभ्यासक आहेत.
संस्कृत भाषेचा असलेला व्यासंग निश्चितच राज्यातील भारतीय ज्ञान परंपरेच्या प्रसारासाठी व विकासासाठी प्रेरक ठरणारा आहे. कारण राज्यातले कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कोकणातील एकमेव संस्कृत उपकेंद्र भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांच्या नावाने गेली 4 वर्षे अविरत सुरू आहे. यात निश्चितच राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि तत्कालीन शासनाचे मोठे योगदान आहे.
भारतीय ज्ञान परंपरेच्या कक्षा कोकणातून सर्वांसाठी खुल्या व्हाव्या आणि अधिकाधिक उपकेंद्राचा विस्तार व्हावा यासाठी मंत्री डॉ. सामंत यांचे विशेष प्रयत्न सदोदित असतात. विश्वविद्यालयाचे विद्यमान कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली या उपकेंद्रातून भारतीय ज्ञान परंपरेतील पारंपरिक व आधुनिक विषयांची सांगड घालून विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रशुद्ध दृष्टिकोन विकसित केला जातो.
उपकेंद्रासाठी 1 एकर जागेची घोषणा
उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी अलिकडेच झालेल्या रत्नागिरीतील बैठकीत उपकेंद्राचा अधिकाधिक उत्कर्ष व्हावा आणि विस्तार व्हावा यासाठी उपकेंद्राला 1 एकर जागा देण्याची घोषणा केली. यामुळे निश्चितच उपकेंद्राच्या इच्छा आकांक्षांना बळ मिळणार आहे. उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी केलेल्या घोषणेमुळे व त्यांच्या सहकार्याने हे उपकेंद्र मोठ्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक प्रा. मराठे यांनी व्यक्त केला आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button