राज्यातील नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांसाठी १०० कोटींची तरतूद!

- महायुती सरकारचा मच्छीमार बांधवांसाठी स्तुत्य निर्णय
मुंबई, ७ ऑक्टोबर २०२५: राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मच्छीमार बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज दिनांक ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी मंत्रालय, मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानग्रस्त मच्छिमार बांधवांसाठी व मच्छीमारांच्या बोटींच्या नुकसान भरपाईसाठी १०० कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. याची घोषणा आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांसह उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार तसेच इतर मंत्रीगण उपस्थित होते. मच्छीमार बांधवांसाठी केलेल्या या तरतुदीबद्दल मंत्री नितेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहेत.
मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांच्या नुकसानीची केली होती पाहणी
राज्यातील मच्छीमार बांधवांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी व मच्छीमार बांधवांना दिलासा देण्यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री श्री.नितेश राणे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन मच्छीमारांच्या नुकसानीचा आढावा घेतला होता. यावेळी मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसानग्रस्त मच्छीमारांना तातडीने मदत जाहीर करण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. तसेच या संदर्भात मंत्री नितेश राणे यांनी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. याची दखल घेत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.