रानभाज्यांचे महत्त्व, व्यवसायाचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्या : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

- कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, रोटरीच्यावतीने रानभाजी जिल्हास्तरीय महोत्सव
रत्नागिरी, दि.15 : जंगलामध्ये शेकडोने रानभाज्या सापडतात. 75 वयापुढील ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेतल्यास अधिक रानभाज्यांची माहिती मिळेल. या रानभाज्यांचे मार्गदर्शन, महत्त्व आणि व्यवसाय याचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्या, असे मार्गदर्शन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
अंबर सभागृहात कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट प्रकल्प), रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमान जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सव व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उद्घाटनप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, आत्माचे प्रकल्प संचालक विजय बेतीवार, रोटरीचे प्रमोद कुलकर्णी, ॲङ स्वप्नील साळवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश सावंत, पणनचे उपसरव्यवस्थापक मिलिंद कुलकर्णी, राहुल पंडीत, बाबू म्हाप, बंड्या साळवी आदी उपस्थिती होते.
पालकमंत्री डॉ. सामंत उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करत होते. ते म्हणाले, हा रानभाज्या महोत्सव महाराष्ट्रात सर्वात मोठा करण्याच्या दृष्टीकोनातून नियोजन करावे. रानभाज्या या विशेषत: श्रावणात सर्वत्र येतात. सर्वात जास्त याच श्रावणात खाल्या जातात. निरोगी आणि स्वस्थ आरोग्यासाठी आहारात त्यांचे महत्त्व आहे. या रानभाज्यांचा व्यवसायदेखील चांगला होऊ शकतो. यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे.
आंबा बागायतदारांसाठी, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी बोलेरो वाहन दिली आहेत. अजून 100 बोलेरो द्यायच्या आहेत. शासनाच्या योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहे. ती तंतोतंत शेतकऱ्यांपर्यंत पोहचली पाहिजे. साडेपाच हजार शेतकऱ्यांना भात, नाचणीचे बियाणे मोफत दिली आहेत. 2 लाख खैर रोपांचे वाटप केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमधून शेतकऱ्यांना ताकद द्या. रानभाज्यांच्या मार्केटींगसाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.
यावेळी आंबा उत्पादक बागायतदारांसाठी वाहतूक वाहन निधीचे वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील प्रक्रियाधारकांसाठी खरेदीदार विक्रेता संमेलन, आंबा उत्पादन व मत्स्य व्यवसायांसाठी आयात निर्यात कार्यशाळाही घेण्यात आली.
सुरुवातीला बळीराजा प्रतिमेचे पुजन आणि दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
