राष्ट्रवादीचे चिपळूणचे संभाव्य उमेदवार प्रशांत यादव यांनी घेतली सुभाष बने यांची भेट!
देवरूख (सुरेश सप्रे) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे महा विकास आघाडीचे संभाव्य उमेदवार प्रशांत यादव यांनी आपली पत्नी सौ. स्वप्ना यादव यांच्यासह उबाठा शिवसेना नेते माजी आमदार सुभाष बने यांची त्यांच्या रत्नसिंधु साडवली येथील निवासस्थानी जाऊन भेट घेत आशीर्वाद घेतले.
शिवसेना नेते बने हे पक्षाच्या कामासाठी मुंबईत गेले होते. तेथून ते खूप दिवसांनी परत देवरूखमध्ये आले असता राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व संभाव्य उमेदवार प्रशांत यादव यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
यावेळी प्रशांत यादव यांनी शिवसेना नेते सुभाष बने व युवासेनेचे नेते रोहन बने यांच्याशी सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत सखोल चर्चा केली व राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून संधी मिळाल्यास आपला व पक्षाचा संपूर्ण पाठिंबा देण्याची मागणी केली. बने पिता पुत्रांनीही याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून या दोन नेत्यांमध्ये लवकरच पुन्हा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह बैठक होण्याची शक्यता आहे.
प्रशांत यादव आणि सुभाष बने यांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीतील मित्र पक्ष उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बारक्याशेठ बने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने उपस्थित होते.