राष्ट्रीय नौकानयन दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनामध्ये मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचा सहभाग

रत्नागिरी : राष्ट्रीय नौकानयन दिनानिमित्त, दि. ५ एप्रिल रोजी मरीन सिंडीकेट प्रायवेट लिमिटेड, रत्नागिरी ने स्वयंवर मंगल कार्यालय, रत्नागिरी येथे आयोजित केलेल्या प्रदर्शनामध्ये, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठांतर्गत शिरगाव, रत्नागिरी येथील मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी व अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
मरीन सिंडीकेट प्रायवेट लिमिटेड चे कॅप्टन दिलीप भाटकर हे मागील ३५ वर्षे हा दिवस साजरा करतात. या वर्षी या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. संदिप कृष्णा, सहाय्यक आयुक्त, कस्टम, रत्नागिरी विभाग यांनी उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी डॉ. मंगेश शिरधनकर, माजी प्राचार्य, मत्स्य अभियांत्रिकी पदविका यांनी तरुणांसाठी सागरी नौकानयन क्षेत्रातील नोकरीच्या संधी, व सागरी प्रदूषण या दोन विषयावर सादरीकरणासह मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे डॉ. केतन चौधरी, विभागप्रमुख, मत्स्य महाविद्यालय यांनी समुद्र या विषयावर उपस्थिताना संबोधित केले.

या प्रसंगी मरीन सिंडीकेट प्रायवेट लिमिटेड मार्फत समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
सदर प्रदर्शनामध्ये, नौकानयनाशी संबंधित विविध साहित्य व उपकरणे यांची मांडणी करण्यात आली होती. यामध्ये नौकांच्या प्रतिकृति, नौकानयन करण्यासाठी आवश्यक उपकरणे, जीवन रक्षक साधने, समुद्रामध्ये अपघात समयी बचावासाठी वापरण्यात येणारे सिग्नल इत्यादींचा समावेश करण्यात आला.

या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना मत्स्य अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी कु. श्रावणी बाणे, कु. सुमय्या फडनाईक, ओंकार कांबळे, कु. हंसिका म्हात्रे, व चारुदत्त खडपे यांनी सर्व साहित्य उपकरणांची सविस्तर व योग्य माहिती दिली. विद्यार्थ्यांबरोबरच विद्यालयाचे सुशिल कांबळे, तौसिफ काझी, निलेश मिरजकर यांनी अभ्यंगतांना नौकानायनसंबंधी मार्गदर्शन केले त्याचबरोबर अभिजीत पाटील, रविशेखर सावंत व संदेश चव्हाण यांनी प्रदर्शनांची मांडणी व नियोजनामध्ये सहाय्य केले. या प्रदर्शनामधील सहभाग विद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष मोहिते यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली पार पडला.
