अजब-गजबमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

लांजातील परसबागेत धनेशची जोडी ; पक्षीप्रेमींमध्ये आनंदी आनंद!

लांजा : धनेश पक्षांच्या वावरामुळे पक्षीप्रेमी सुखावले आहेत. नितीन कदम यांच्या परसबागेत
कदम फार्म,अमृतसृष्टी कॉलनी, केळंबे, लांजा या ठिकाणी धनेशची नर मादी जोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कु. आर्या नितीन कदम लांजा हिने परसबागेत आपल्या कॅमेऱ्यामध्ये धनेश पक्ष्याची जोडी टिपली आहे. शहराजवळ कळंबे येथील ‘अमृत सृष्टी’ या परिसरात धनेश पक्ष्यांची वावर दिसून येऊ लागला आहे.

इंग्रजीमधील याला हॉर्नबिल तर मराठीमध्ये मलबारी धनेश, गरुड धनेश किंवा राज धनेश या नावांनीही ओळखले जाते. अतिशय सुंदर रंगांमुळे हा पक्षी लक्ष वेधून घेतो. विविध प्रकारची फळे हे त्याचे मुख्य खाद्य आहे. झाडाच्या ढोलीत तो घरटे बांधतो व चिखलाने झाकून टाकतो व पिल्लांसाठी केवळ अन्न देता येईल, एवढी एकच लहान उभी फट ठेवतो. या फटीतून पिल्लांना चारा पुरवला जातो.

हा पक्षी भारतातील केरळ आणि अरुणाचल प्रदेश आणि म्यानमार मधील चिन राज्याचा राज्य पक्षी आहे. तसेच भारतात पक्ष्यांवर संशोधन करणाऱ्या अग्रणी संस्था बी. एन. एच. एस या संस्थेचे मानचिन्ह आहे.

या पक्ष्यांची चोच फार मोठी व सिंगासारखी असल्यामुळे यांना इंग्रजी भाषेत हॉर्नबिल हे नाव दिलेले आहे. या पक्ष्यांचे एकंदर स्वरूप असामान्य असते.

भारतात धनेशाच्या पाच-सहा जाती आहेत. यांपैकी मोठा धनेश (ग्रेट हॉर्नबिल) सगळ्यात मोठा असून त्याचे शास्त्रीय नाव ब्यूसेरॉस बायकॉर्निस असे आहे. ही जाती पश्चिम घाटात मुंबईपासून कन्याकुमारीच्या भूशिरापर्यंत आणि हिमालयाच्या खालच्या रांगांमध्ये १,५२५ मी. उंचीपर्यंत आढळते. बाकीच्या जातींपैकी करडा धनेश वा सामान्य धनेश ही जाती फक्त भारतातच आढळणारी असून तिचे शास्त्रीय नाव टॉकस बायरोस्ट्रीस असे आहे. हिमालयाच्या पायथ्यापासून खाली सगळीकडे (मलबार किनारा, थोडा राजस्थान व आसाम वगळून) ती आढळते. बाकीच्या जाती वेगळ्या भागांत आढळतात.

मोठ्या धनेशाची लांबी सुमारे १३० सेंमी. असते. डोके, पाठ छाती वा पंख काळे असून पंखांवर आडवा पांढरा पट्टा असतो. मान व पोट पांडरे असते, शेपटी लांब व पांढरी असून तिच्या टोकाजवळ काळाआडवा पट्टा असतो. नराचे डोळे तांबडे व मादीचे पांढरे असतात. चोच मोठी मजबूत बाकदार व पिवळी असते, डोके आणि चोचीचे बूड यांवर एक मोठे शिरस्त्राण असते, त्याचा रंग पिवळा असून वरचे पृष्ठ खोलगट असते, पायांचा रंग काळपट असतो.

हा अरण्यात राहणारा पक्षी असून फार मोठ्या व उंच झाडांवर लहान थवे करून ते राहतात.याच्या असामान्य स्वरूपामुळे तो सहसा नजरेतून सुटत नाही. उडत असताना याच्या पंखांचा होणारा आवाज दीड किमी. वर तरी ऐकू जातो. झाडावर स्वस्थ न बसता हे ओरडून गोंगाट करीत असतात.

फायकस कुलातील वड, पिंपळ अशी फळे हा जरी यांचा मुख्य आहार असला, तर ते किडे, सरडे किंवा इतर अन्न खात असल्यामुळे त्यांना सर्वभक्षी म्हणता येईल. फळे किंवा इतर खाद्यपदार्थ खाण्याची यांची रीत मोठी विलक्षण आहे. ते पदार्थ चोचीने वर उडवून आ वासतात व तो घशात पडला म्हणजे गिळतात.

याच्या विचित्र शिरस्त्राणाच्या उपयोगाविषयी काहीही माहिती नाही. ते भरीव नसून त्याचा आतला भाग स्पंजसारखा असल्यामुळे ते हलके असते.

मोठ्या धनेशाच्या प्रजोत्पादनाचा काळ जानेवारीपासुन एप्रिलपर्यंत असतो. या काळातले याचे एकंदर वर्तन करड्या धनेशासारखेच असते.

करडा धनेश घारीएवढा असून त्याची लांबी सु. ६० सेंमी. असते. दिसायला हा बेढब असतो. वरचा भाग तपकिरी करड्या रंगाचा असतो. शेपटी लांब, निमुळती व तपकिरी रंगाची असते. शेपटीतील प्रत्येक पिसाच्या टोकाजवळ काळा पट्टा असतो. व टोक पांढरे असते, छाती करड्या रंगाची व पोट पांढरे असते. चोच मोठी बाजूंनी चपटी, वाकडी व काळी असते आणि तिच्यावर टोकदार नळकांड्यासारखे शिरस्त्राण असते.

हा पूर्णपणे वृक्षवासी असून विशेष दाट झाडी नसलेल्या प्रदेशातील मोठ्या जुनाट झाडांवर राहतो. कधीकधी बागांत किंवा झाडीतही तो दिसतो. यांचे लहान थवे असतात. निरनिराळ्या प्रकारची फळे, कोवळे कोंब, किडे, सरडे, उंदराची पिल्ले ते खातात. यांना फार जोराने उडता येत नाही. यांचा आवाज किंचाळल्यासारखा असून घारीच्या आवाजाची आठवण करून देतो. यांच्या विणीचा हंगाम एप्रिल ते जून असतो. मादी २-३ पांढरी अंडी घालते. या हंगामातले यांचे आणि बाकीच्या बहुतेक धनेशांचे वर्तन असामान्य असते. खाली दिलेली माहिती सर्वांना सारखीच लागू पडणारी आहे.

प्रियाराधनेनंतर नर मादीचा जोडा जमतो. अंडी घालण्याच्या सुमारास मादी एखाद्या उंच झाडाच्या खोडातल्या तीन मी. पेक्षा जास्त उंचीवर असलेल्या ढोलीत जाते. ही ढोली यांचे घरटे होय. स्वतःची विष्ठा आणि नराने आणलेला चिखल यांच्चया मिश्रणाने ती ढोलीच्या कडा लिंपते.चोच आतबाहेर करता येईल एवढीच उभी फट त्यात ठेवते. मादी या वेळी खरीखुरी बंदिवान होते. नर वरचेवर खाद्यपदार्थ आपल्या चोचीतून आणतो आणि ती फटीतून चोच बाहेर काढून ते खाते. पिल्ले सुरक्षित बाहेर पडेपर्यंत श ध्यास तिला भरवावे लागत असल्यामुळे नर या जास्त श्रमांमुळे रोडावतो, पण मादी चांगली गुबगुबीत होते. बंदीवासात असताना मोठ्या धनेशाच्या मादीची पिसे गळून पडतात व नवी उगवतात.

पिल्ले १५ दिवसांची झाल्यावर मादी ढोलीवरील लिंपण चोचीने फोडून बाहेर पडते, पण पिल्ले आतच असतात. सामान्यतः बाहेर पडल्यावर मादी दार पुन्हा लिंपून टाकते. त्यानंतर पिल्ले मोठी होऊन बाहेर येईपर्यंत नर आणि मादी दोघे त्यांना भरवतात.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button