लांजातील महामार्ग दुरवस्थेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उद्या महत्त्वपूर्ण बैठक
लांजा : लांजा नगर पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लांजा तहसील कार्यालय येथे महामार्ग विभाग अधिकारी आणि ठेकेदार आणि नगरपंचायत यांची संयुक्त बैठक उद्या बुधवार दि. १९ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे.
लांजा नगर पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. हर्षला राणे यांनी या बैठकीला महामार्ग कार्यकारी अभियंता यांना निमंत्रित केले आहे.
लांजा शहरात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पावसाळ्याच्या सुरुवातीला अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. पावसामुळे चिखलाचे साम्राज्य आणि वाहतुकीची कोंडी होत असल्याने नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन नुकतेच येथील नागरिकांनी उड्डाणपुलाचे काम बंद पडले होते. यावर तातडीने स्थानिक पत्रकार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटाचे पदाधिकारी, आमदार राजन साळवी यांनी हालचाली करून महामार्ग अधिकाऱ्यांना या मार्गाच्या दुरवस्थेबाबत लक्ष वेधले होते. त्यावर तातडीने महामार्ग ठेकेदार कंपनीला खड्डे आणि साईडपट्ट्या गटारे यांचे काम युद्ध पातळी करण्याचे आदेश दिले होते.
महामार्गाच्या दुरवस्थे संदर्भात नागरिकांचा रोज लक्षात घेता लांजा नगर पंचायत आणि जिल्हाधिकारी प्रशासन यांनी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन बैठकीत लांजा शहराचा महामार्ग प्रश्न उपस्थित करण्यात आला. नगर पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचित करून तातडीने लांजा तहसील येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तहसीलदार प्रमोद कदम यांच्या अध्यक्षतेखाली महामार्ग अभियंता आणि ठेकेदार नगर पंचायत प्रशासन आणि राज्यातील नागरिक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.