लांजात ताजिया मिरवणुकीची हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा आबाधीत !
- लांजात मोहरम ताजिया मिरवणूक उत्साहात
लांजा : राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेला लांजातील मोहरम ताजिया धार्मिक पध्दतीने अतिशय उत्साही वातावरणात पार पडला
मुस्लिम बांधवांच्या पवित्र मोहरम उत्सवानिमित्त शरातून ढोल-ताशांच्या गजरात ताजियाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. शहरात हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा लाभलेल्या या मिरवणुकीत दरवर्षी प्रमाणे शहरातील प्रमुख मानकरी इतर हिंदू बांधव ही सहभागी झाले होते. मागील दहा दिवसांपासून सुरु असलेल्या या उत्सवात अंतिम टप्प्यातील मिरवणूकीत शहरातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.
या मिरवणुकीचा शहरातील हजरत सय्यद चाँदशहा बुखारी दर्गाहमधून दुपारी चार वाजता प्रारंभ झाला. बाजारपेठेतील जूना बस स्टॉप, हनुमान मंदिर, जूनी बाजारपेठ वसाहत, पौलसतेश्वर मंदिर येथील तळया जवळून चव्हाटा मंदिर, जामा मशीद या मार्गावरुन पुन्हा दर्गाह मध्ये संध्याकाळी सात वाजता ताजिया मिरवणूकीची सांगता झाली. गेले सहा दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसाने दुपारनंतर उसंत घेतल्याने ताजिया मिरवणुकीस अधिकच रंगत आली.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लांजा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.