लांजा येथील वर्षा चव्हाण यांना ‘कोकणरत्न’ पुरस्कार प्रदान
स्वतंत्र कोकण राज्य अभियानतर्फे मुंबईतील आझाद मैदान येथे गौरव सोहळा

मुंबई ( सुरेश सप्रे ): लांजा तालुक्यातील कन्या आणि बदलापूरमधील सामाजिक-राजकीय क्षेत्रातील सक्रिय नेत्या वर्षा चव्हाण यांना स्वतंत्र कोकण राज्य अभियान तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘कोकणरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईतील आझाद मैदान येथील पत्रकार भवनात पार पडलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
बदलापूरमधील तरुण, तडफदार महिला नेतृत्व
उबाठा शिवसेनेच्या संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या वर्षा चव्हाण या बदलापूर शहरातील सामाजिक व राजकीय वर्तुळात एक तरुण, तडफदार आणि प्रभावी महिला नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. त्या विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सातत्याने कार्य करत आहेत.
सामाजिक कार्यातून राजकीय वाटचाल
सामाजिक कार्याची आवड आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यांचा संगम साधत त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात लांजा–रत्नागिरी येथून केली. प्रारंभी स्फूर्ती फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी महिला सक्षमीकरण, आरोग्य शिबिरे, जनजागृती मोहिमा आणि सामाजिक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या या कार्यामुळे जनसंपर्क वाढत गेला आणि त्याच काळात त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला.
शिवसेनेतील संघटनात्मक जबाबदाऱ्या
२०२३ – शिवसेना उपशहर संघटिका
२०२५ – उबाठा शिवसेना महिला आघाडी, बदलापूर पूर्व संपर्कप्रमुख
सामाजिक व मानवाधिकार क्षेत्रातील योगदान
राजकारणासोबतच वर्षा चव्हाण यांचा सामाजिक आणि मानवाधिकार क्षेत्रातील सहभागही उल्लेखनीय आहे. त्या कोकण युवा सेवा संस्थाच्या सदस्य असून आंतरराष्ट्रीय ह्यूमन राईट्स संघटनाच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यातून सामाजिक बांधिलकीचा व्यापक दृष्टीकोन दिसून येतो.
अनेक पुरस्कारांनी सन्मान
वर्षा चव्हाण यांच्या कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वीही विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यामध्ये –
जनादेश टीव्ही न्यूज व निर्भय पत्रकार संघटनेतर्फे ‘जननायिका’ पुरस्कार
वैभव फाउंडेशन, गोवा तर्फे ‘भारत निर्माण योगदान पुरस्कार’
पूर्णत्व फाउंडेशनचा ‘सन्मानमूर्ती’ पुरस्कार
नव्या पिढीच्या महिलांसाठी प्रेरणा
कोकणातील लांजा तालुक्यातील सुकन्या असलेल्या वर्षा चव्हाण या बदलापूरसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात सामाजिक व राजकीय कार्यात अग्रेसर आहेत. युवा महिला नेतृत्व म्हणून त्या आज नव्या पिढीच्या महिलांसाठी प्रेरणास्थान ठरत असून, भविष्यात मुंबई व कोकणातील महिलांसाठी नवीन संधी, उपक्रम आणि सशक्ततेसाठी व्यापक कार्य करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.





