लांजा येथे सुसज्ज व अत्याधुनिक सोयी सुविधांनीयुक्त भू-प्रणाम केंद्राचे उद्घाटन

- जनतेने लाभ घेण्याचे उपसंचालक अनिल माने यांचे आवाहन
रत्नागिरी : भूमी अभिलेख विभागांतर्गत उप अधीक्षक भूमी अभिलेख, लांजा येथे सुसज्ज व अत्याधुनिक सोयी सुविधांनीयुक्त भू-प्रणाम केंद्राचे उद्घाटन भूमी अभिलेख, कोकण प्रदेश मुंबईचे उपसंचालक अनिल माने यांच्या हस्ते करण्यात आले. जनतेसाठी भूमी अभिलेख विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध सेवा भू-प्रणाम केंद्रातून उपलब्ध होणार आहेत. याचा अधिकाधिक जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. माने यांनी यावेळी केले.
भू-प्रणाम केंद्रामध्ये अभ्यागतांसाठी सुसज्ज बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय व प्रतिक्षालय याची सोय करणेत आली असून त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांसाठी उत्तम दर्जाची सुविधा उपलब्ध झाली आहे. भूमी अभिलेख विभागाची वाटचाल आधुनिकीकरणाकडे होत असून त्याचाच एक भाग म्हणून राज्यात दोन टप्प्यांमध्ये एकूण 30 भू-प्रणाम केंद्र स्थापित करण्यात आली आहेत.
या केंद्रामध्ये भूमी अभिलेख विभागामार्फत विविध सेवांतर्गत संगणकीकृत मिळकत पत्रिका, मिळकत पत्रिकेवरील फेरफार, सर्व प्रकारच्या फेरफारासाठी अर्ज, ई-मोजणी व्हर्जन २.० मध्ये सर्व प्रकारची मोजणी नकाशे, मिळकतीचे डिजीटल साईन केलेले सर्व प्रकारचे नकाशे इत्यादी सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ईपीसीआयएस प्रकल्पांतर्गत फेरफार नोंदवहीचा उतारा, परिशिष्ट अ, परिशिष्ट ब, नमुना नं. ९ ची नोटीस, नमुना नं. १२ ची नोटीस, अर्जाची पोच, रिजेक्शन पत्र, त्रुटीपत्र, निकाली पत्र, विवादग्रस्त नोंदवही उतारा, सर्व प्रकारच्या अपिल निर्णयाच्या प्रती व इतर संगणकीकृत अभिलेख उपलब्ध करुन दिलेले आहेत. तसेच त्याचे दरही निश्चित करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी, उप अधीक्षक भूमी अभिलेख लांजा नरेंद्र गोरे, नगर भूमापन अधिकारी सोनल काळे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.