लोकनेते पेजे यांच्या चरित्राचा अभ्यास करावा : ना. उदय सामंत

रत्नागिरी, दि. १७ : पारदर्शीपणाने स्वत:चे नेतृत्व कसे जपावे हे लोकप्रतिनिधींना पहावयाचे असेल तर, त्यांनी लोकनेते पेजेंच्या चरित्राचा अभ्यास करावा, एवढे मोठे त्यांचे नेतृत्व होते. परदेशात गेल्यानंतर त्यांचा देश स्वच्छ रहावा, म्हणून आपण तेथील नियमांचे काटेकोर पालन करतो. त्याचेच अनुकरण करुन आपला परिसर, आपले महाविद्यालय स्वच्छ ठेवावे, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
लोकनेते शामराव पेजे जयंती निमित्त येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य यु. व्ही. पाटील, पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एम. शिंदे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश बंगाळे, लोकनेते शामराव पेजे यांचे चिरंजीव शिरीष पेजे, नातू विकास पेजे आणि कुटुंबीय उपस्थित होते.
उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, लोकनेते शामराव पेजे यांचे नाव अभियांत्रिकी महाविद्यालयाला का दिले, याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती करुन घ्यावी. पारदर्शीपणे स्वत:चे नेतृत्व कसे जपावे, हे खासदार आमदारांना पहावयाचे असेल तर त्यांनी रत्नागिरीत येऊन लोकनेते शामराव पेजे यांच्या चरित्राचा अभ्यास करावा लागेल, एवढं मोठे त्यांचे नेतृत्व होते.
देशातला पहिला थ्री डी मल्टीमीडिया शो थिबा पॅलेस परिसरात होत आहे. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचा इतिहास जाणून घ्यावा. जगभरातील पर्यटक आपले तंत्रज्ञान आणि शो पहायला येतील. यामध्ये या भूमीचा, महापुरुषांचा इतिहासाची माहिती पहायला मिळेल.
महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सर्व सुविधा सुरु कराव्यात. विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह आपल्या सर्वांची परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आहे. शौचालये, स्वच्छतागृहे अतिशय स्वच्छ ठेवली पाहिजेत. परदेशात गेल्यावर त्यांचा देश स्वच्छ रहावा, म्हणून तेथील कडक नियमांचे काटेकोरपणे पालन करतो. त्याचेच अनुकरण आपल्या देशातही सर्वांनी करावे, असेही उद्योगमंत्री म्हणाले.