ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयराष्ट्रीयलोकल न्यूजशिक्षणसायन्स & टेक्नॉलॉजी

लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालय प्रेरणा आणि ऊर्जा देणारे स्मारक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी, दि. 21 : लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय हे युवकांना प्रेरणा देणारे चालते बोलते स्मारक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

आज रत्नागिरी येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उद्घाटन आणि लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालय नामकरण सोहळ्यात ते बोलत होते.

या कार्यक्रमात पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, विद्यार्थ्यांना ज्ञानासोबत स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभे राहण्यासाठी शासन बळ देत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भारत हा देश २०४७ साली महासत्ता बनवायचा आहे. त्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य संपादित करण्याची आवश्यकता आहे. त्याचे स्वप्न साकार करण्यासाठी तरुणांनी पराकाष्ठा करावी. महाराष्ट्रात उद्योगासाठी चांगले वातावरण आहे. त्यासाठी लागणारी स्कील मॅनपॉवर देखील राज्यात उभे राहत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. त्याच्याप्रमाणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेलाही प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. पदवीधर असेल तर दहा हजार रुपये महिन्याला दिले जातात. हे सरकार सर्व घटकांसाठी विविध योजना राबवित आहे. जर्मन सरकारशी राज्याने करार करुन चार लाख रोजगाराची संधी विविध वीस प्रकारच्या विभागात उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे अनेक तरुणांना काम मिळेल. ड्रोन तंत्रज्ञान काम करण्यासाठीही योजना निर्माण केली आहे. परिसस्पर्श योजनेतंर्गत २ हजार महाविद्यालयात ही योजना राबविली जाणार आहे. हे सरकार नोकऱ्या उपलब्ध करुन देणारे सरकार आहे.

डाव्होस येथे झालेल्या परिषदेत पहिल्या वर्षी १ लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणकीचे करार झाले तर दुसऱ्या वर्षी ३ लाख ५० कोटी रुपयांचे करार झाले. त्यातून ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आपल्या राज्यात झाली आहे. उद्योगासाठी पोषक वातावरण आणि आवश्यक त्या सोयी सवलती एक खिडकी योजनेत उपलब्ध करुन दिल्या जात असल्याने राज्यात उद्योग मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्यासाठी लागणारे रोजगार कौशल्य देखील येथील तरुण घेत आहेत. संरक्षण साहित्य निर्मिती करणारा १० हजार कोटी रुपये गुंतवणूकीचा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात उभा राहतो आहे. काही महिन्यांपूर्वी कोकाकोला कंपनीचे भूमिपूजन केले. औद्योगिकीकरणाला अधिक गती देण्यासाठी चांगले वातावरण निर्माण केले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, दोन वर्षापूर्वी मी पाहिलेलं रत्नागिरी हे शैक्षणिक हब व्हावे हे स्वप्न आज केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे साकार होत आहे याचा मला विशेष आनंद आहे. दोन वर्षापूर्वी या इमारतीचे भूमिपूजन केले आणि इमारत पूर्ण झाली. गतीमान सरकार म्हणून जिल्ह्यात विविध कामे उभी राहत आहेत. ५०० कोटी रुपये वैद्यकीय महाविद्यालयासाठी आणि २५० कोटी अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ मंजूर केल्याने शैक्षणिक हब हे स्वप्न पूर्ण झाले आहे. ही इमारत बांधताना निर्माण ग्रुपने मोठी मेहनत घेतली आणि आयआयटीच्या धर्तीवर देखणी इमारत उभी राहिली आहे. पुढील वर्षापासून शासकीय विधी महाविद्यालय देखील सुरु होणार आहे. मुख्यमंत्री छात्र प्रशिक्षण योजनेतंर्गत जिल्ह्यात ३१९ मुलांना रोजगार प्राप्त झाला याचा विशेष आनंद आहे. आमदार श्री. निकम यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात विकास पेजे आणि सहकारी यांनी मुख्यमंत्री यांचा विशेष सत्कार केला. कुणबी समाजाच्या वतीने मुख्यमंत्री यांचा विशेष प्रातिनिधीक सत्कार संजय झिमण यांच्या हस्ते करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते निर्माण ग्रुपच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी तंत्रशिक्षण सहसंचालक प्रमोद नाईक यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. सुनिल पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक उपस्थित होते.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button