महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

लोवले येथे अपार कष्टातून झेंडूचं शेत बहरलं सोन्यावाणी !

  • लोवले येथील युवा शेतकरी शुभम दोरकडे याचा प्रयोग
  • आई-वडिलांच्या कष्टाची साथ

संगमेश्वर : दसरा-दिवाळीला झेंडूची फुले घेऊन घाटमाथ्यावरून बरेच व्यापारी कोकणच्या विविध बाजारात येत असतात. कारण कोकणामध्ये झेंडूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात नाही. पूर्वी शेताच्या बांधावर कुठे तरी आपल्याला झेंडू फुललेला दिसायचा. मात्र, याला आता संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथील युवा शेतकरी शुभम दोरकडे यांनी आपल्या घराच्या शेजारी झेंडूची लागवड केली आणि हा झेंडू आता पूर्ण क्षमतेने फुलून आला आहे. एकंदरित आपल्या लाल मातीत सुद्धा झेंडूचे शिवार बहरले जाऊ शकते, हे त्यांनी आपल्या लागवडीतून दाखवून दिले आहे.

संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथील युवा शेतकरी शुभम दोरकडे याने कृषी पदवी घेतली आहे. आपल्या शेतात शुभम हा त्याचे वडील संतोष आई सविता आणि बहीण प्रणिता यांच्या मदतीने शेती मधील विविध प्रयोग करत असतो. यावर्षी घराच्या शेजारी असणाऱ्या जागेत त्यांनी झेंडूची लागवड केली आहे. जून महिन्यामध्ये ही लागवड पूर्ण केली. ही लागवड करताना त्यांनी संपूर्ण शेत नांगरून घेत बाडे तयार केले. या लागवडीनंतर त्यांची उत्तम प्रकारे देखभाल करण्यासाठी सेंद्रिय खते आणि जीवामृतची फवारणी केली. लाल मातीमध्ये झेंडू मोठ्या प्रमाणात कधीच घेतला जात नाही.

दसरा आणि जास्तीत जास्त दिवाळीपर्यंत देवपूजेसाठी झेंडूची फुले उपयोगी पडतात. मात्र मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड करून त्यातून उत्पन्न घेण्याची संकल्पना लाल मातीत फारशी रुजलेली नव्हती. मात्र सध्या शेतकरी वर्गाने झेंडूची मोठया प्रमाणात आणि व्यावसायिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून लागवड करण्यास सुरुवात केली आहे.असाच प्रयोग कृषी पदवीधर युवा शेतकरी शुभम दोरकडे यांनी आपल्या घराच्या शेजारी झेंडूची लागवड करुन केला आणि हा झेंडू आता उत्तम प्रकारे फुलून आलेला आहे.

केशरी आणि पिवळा अशा रंगांमध्ये झेंडू फुललेला पाहून संगमेश्वर देवरुख मार्गावरून जाणारे वाहनचालक आणि प्रवासी झेंडूचा सोनेरी मळा पाहण्यासाठी आवर्जून थांबतात. नवरात्र उत्सवा पासून दोराकडे यांनी झेंडू विक्री सुरु केली आहे. नवरात्रात झेंडूचा दर संगमेश्वर मध्ये २५० रुपये किलो असताना संतोष दोरकडे यांनी ग्राहकांना २०० रुपये किलो या दराने झेंडू उपलब्ध करुन दिला. आता दीपावली उत्सवा मध्ये झेंडूचा बाजारपेठेतील दर १५० रुपये असताना दोरकडे यांनी केवळ १०० रुपये किलो या दराने झेंडूची विक्री सुरु केली असून त्याला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. दोरकडे यांनी आपल्या घराजवळच कृष्णाई या नावाने नर्सरी सुरु केली असून शुभमच्या मार्गदर्शना खाली संपूर्ण दोरकडे कुटुंब विविध प्रकारची रोपं स्वतः तयार करुन त्यांची विक्री करत आहेत. झेंडू, पालेभाजी आणि शेती विषयक विविध उत्पादनांची विक्री करण्यासाठी दोरकडे यांनी आपल्या घराजवळच विक्री केंद्र सुरु केले आहे.

वानरांच्या उपद्रवातून मुक्ती मिळावी

आमच्या कुटुंबांची शेतात राबून कितीही कष्ट करण्याची तयारी आहे. झेंडू बरोबरच आम्ही विविध प्रकारची पालेभाजी, अन्य भाज्या यांचीही लागवड करतो. ग्राहकांची या सर्वाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. झेंडूच्या उत्पादनानंतर आम्ही कलिंगडाची लागवड करतो. मात्र शेतात राबून आम्ही जेवढे कष्ट करतो तेवढं उत्पादन वानरांकडून होणाऱ्या उपद्रवामुळे हाती येत नाही. कष्ट करण्यापेक्षा शेतात राखण करण्यावरच अधिक भर द्यावा लागतो. वानरांकडून होणारी पिकाची हानी उघड्या डोळ्यांनी पहावी लागते. शेतकऱ्यांना वानरांच्या त्रासातून मुक्ती मिळावी,अशी अपेक्षा संतोष दोरकडे यांनी व्यक्त केली आहे.

▪️सेंद्रीय खतावर अधिक भर

रासायनिक खतामुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता, आपण शेतातून जे काही उत्पादन घेतो त्यासाठी सेंद्रिय खतावरच अधिक भर देत असल्याचे युवा शेतकरी शुभम दोरकडे यांनी सांगितले. कोकणातील युवा शेतकऱ्यांनी झेंडू, कलिंगड, पालेभाज्या तसेच रब्बी पिकांच्या लागवडीवर अधिकाधिक भर द्यावा यासाठी आपण आवश्यक ते मार्गदर्शन करू असेही शुभम दुरकडे यांनी नमूद केले.

admin

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button