‘वंदे भारत’साठी कोकणवासियांना रेल्वेकडून नवीन वर्षाचं गिफ्ट!
मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा रत्नागिरी, खेडचा आरक्षण कोटा दुपटीने वाढला
एसी चेअर कारच्या रत्नागिरी आणि खेड कोट्यातून ४४ तिकीटे बुक करता येणार
कोकण विकास समितीच्या मागणीला यश
रत्नागिरी : गोव्यातील मडगाव ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस या प्रवाशांची पसंती वाढत चाललेल्या सेमी हाय स्पीड ट्रेनला रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तसेच खेड या थांब्यांसाठी आधी देण्यात आलेला आरक्षण कोटा दुपटीने वाढवण्यात आला आहे. या संदर्भात कोकण विकास समितीने ही गाडी सुरू झाल्यापासून रेल्वे कडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. वंदे भारत एक्सप्रेससाठी हा वाढीव आरक्षण कोटा 3 जानेवारी 2024 पासून लागू होत आहे.
रेल्वे मंत्रालयाने दि. २८ जून, २०२३ पासून मुंबई आणि मडगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरु केली. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिवी येथे थांबे दिले गेले. कोकण रेल्वेने २२२३० मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला मडगाव, थिवी आणि कणकवलीसाठी एसी चेअर कार साधारण ३५० व एक्सिक्युटीव्ह क्लास ३० अशा एकूण ३८० जागा तर रत्नागिरी आणि खेडसाठी एसी चेअर कार २२ व एक्सिक्युटीव्ह क्लास ४ अशा केवळ २६ जागांचा आरक्षण कोटा निश्चित केला केला होता. यामुळे रत्नागिरी व खेड या दोन्ही स्थानकातून वंदे भारतला अपेक्षित उत्पन्न मिळण्यास अडथळा निर्माण झाला होता.
ही तफावत लक्षात घेता कोंकण विकास समितीने पहिल्या दिवसापासून मुंबईकडे येणाऱ्या २२२३० मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमधील एसी चेअर कारचा रत्नागिरीपासूनचा आरक्षण कोटा वाढवण्याची मागणी लावून धरली होती. ऑगस्ट महिन्यात यासाठी पुन्हा पाठपुरावा केला होता.
रत्नागिरी तसेच खेडसाठी असलेला अवघ्या 22 आसनांचा कोटा वाढवावा या मागणीची दखल घेत कोकण रेल्वेने १२० दिवसांच्या आगाऊ आरक्षण कालावधीपासून आरक्षण कोटा वाढवलेला आहे. त्यानुसार, दि. ३ जानेवारी, २०२४ पासून २२२३० मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमधील एसी चेअर कारचा रत्नागिरीपासूनचा आरक्षण कोटा दुपटीने वाढवून आधीच्या २२ ऐवजी ४४ केला आहे. त्यामुळे जानेवारीपासून रत्नागिरी व खेडसाठी एसी चेअर कार ४४ व एक्सिक्युटीव्ह क्लास ४ अशा एकूण ४८ जागांचा आरक्षण कोटा उपलब्ध असेल. याबद्दल कोंकण रेल्वेचे मनापासून आभार. रत्नागिरी व खेडमधील प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा.
– अक्षय मधुकर महापदी
सदस्य, कोंकण विकास समिती