वाढत्या रिक्षांमुळे उत्पन्नात घट

- वाढत्या रिक्षाच्या संख्येमुळे रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ
उरण दि. ५ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यात पूर्वी मोजक्याच रिक्षा होत्या त्यामुळे रिक्षा चालकांना चांगला रोजगार उपलब्ध होत होता. कालांतराने औद्योगिकीकरण वाढले. लोकसंख्या वाढली. दळणावळणाची साधने वाढले. सुख सुविधा वाढल्या त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष परिणाम रिक्षा चालकांवर झाला आहे. उरण तालुका तालुक्यात दिवसेंदिवस रिक्षांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, कर्जाचे हप्ते भरू की कुटुंबाच्या पोटाची खळगी, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे.
उरण तालुक्यात खासगी वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली असतानाच रिक्षांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे या व्यवसायातही स्पर्धा सुरू झाली असून हा व्यवसाय करणाऱ्यांचे उत्पन्न घटू लागले आहे. त्यामुळे रिक्षासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करतानाच कसरत होत असल्याने उरलेल्या उत्पन्नातून कुटुंबाचे पोट कसे भरायचे, ही चिंता रिक्षा व्यावसायिकांना सतावत आहे. कमी अंतरावर जाण्यासाठी सर्वांनाच रिक्षा हे साधन सोयीस्कर ठरत असते. त्यामुळे या व्यवसायात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
बहुतेक जणांनी रिक्षासाठी कर्ज घेतलेले असल्याने त्याची यातूनच परतफेड होत असते आणि उदरनिर्वाह सुरू असतो. मात्र, रिक्षांची संख्या वाढल्याने प्रत्येक व्यावसायिकालाच आता यातून पुरेसे उत्पन्न मिळेनासे झाले आहे. त्यामुळे मुलांची शाळेची फी, पुस्तके, शैक्षणिक साहित्य महागल्याने हा खर्च करताना नाकी नऊ येत आहेत. अशातच संघटनेव्यतिरिक्त काही रिक्षा चालक हे बाहेरूनच कमी पैशांमध्ये प्रवासी भाडे मारत असल्याने त्याचा मोठा फटका संघटनेतील रिक्षा चालकांना बसला आहे. या रिक्षा व्यवसायात मोठया प्रमाणात बेरोजगार मराठी तरुण आहेत. अगोदरच नोकऱ्या नाहीत. त्यात व्यवसाय करूनही पोट भरत नसल्याने रिक्षा चालकांवर उपासमिरिची वेळ आली आहे.
रिक्षा चालकांकडुन वाहतूक पोलीस प्रशासना तर्फे दंड वसूल केला जातो तो भरपूर वसूल केला जातो.ज्यांची कागदपत्रे व्यवस्थित व योग्य असतील अशा बेरोजगारांना रिक्षा चालविण्याची परवानगी दिली पाहिजे. ज्यांना नोकऱ्या आहेत तसेच जे श्रीमंत आहेत त्यांना नवीन रिक्षा घेण्यासाठी परवानगी देण्यात येऊ नये. हल्ली रिक्षा चालवीने परवडत नाही. कारण महागाई वाढली आहे. सीएनजी बाटला पासिंगचे दर वाढले आहेत. सर्वच बाबतीत शासनाने फी वाढवून ठेवली आहे. जे रिक्षा स्क्रॅपच्या आहेत त्यांनाही HRP नंबर दिले जात आहेत. उरण मोरा रोड वर अशा रिक्षा भरपूर आहेत पोलीस मात्र त्यांच्यावर कारवाई करीत नाहीत. सर्व सामान्य रिक्षा चालकांना जगणे मुश्किल झाले आहे.नवीन रिक्षाच्या वाढत्या संख्येमुळे स्पर्धा निर्माण झाली असून स्पर्धेत टिकणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.
-दिनेश हळदणकर, अध्यक्ष रिक्षा संघटना, गणपती चौक, उरण शहर.
कंपनीत नोकऱ्या असूनही तसेच घरची परिस्थिती चांगली असूनही, श्रीमंत असूनही अनेक तरुण, नागरिक या धंद्यात उतरले आहेत. शासन आर्थिक परिस्थिती व इतर कोणत्याही गोष्टी न बघता सरसकट सर्वांना परमिट देत आहे. रिक्षा घेण्याची सर्वांनाच परमिशन देत आहे. त्यामुळे ज्यांना कोणाचाच आधार नाही जे बेरोजगार तरुण आहेत, गरीब होतकरू आहेत त्यांच्या पोटावर पाय पडले आहे. जे नोकरी करतात तसेच जे श्रीमंत आहेत त्यांना नवीन रिक्षा घेण्यासाठी किंवा चालविण्यासाठी परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी रिक्षा चालकांनी केली आहे.