Ratnagiri | विकासासाठी स्थानिक उत्पादनांवर प्रक्रिया गरजेची : डॉ. केतन चौधरी

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी( Ratnagiri) येथे दि.३० डिसेंबर २०२५ रोजी “मत्स्य पदार्थ निर्मिती प्रात्यक्षिके व महिला शेतकरी मेळावा” या एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे व विस्तार शिक्षण संचालक डॉ. मकरंद जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच आसमंत फाउंडेशन, रत्नागिरी यांचे आर्थिक सहकार्य मिळाले.

कार्यशाळेचे उद्घाटन सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षीय भाषणात डॉ. चौधरी यांनी सांगितले की, “शाश्वत विकास साध्य करायचा असेल तर स्थानिक उत्पादनांवर प्रक्रिया व मूल्यवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. मत्स्य पदार्थांच्या मूल्यवर्धनाला पर्याय नाही.” कोकण कृषी विद्यापीठ महिलांना प्रशिक्षण देऊन उद्योजकतेस चालना देत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. आसिफ पागरकर यांनी केली. प्रमुख पाहुण्या म्हणून मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मत्स्य विकास अधिकारी श्रीमती लतिका गावडे उपस्थित होत्या. त्यांनी मत्स्य मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती उद्योगात यशस्वी होण्यासाठी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रातील डॉ. हरीश धमगाये, प्रा. नरेंद्र चोगले, प्रा. सचिन साटम, तसेच श्रीमती वर्षा सदावर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती अपूर्व सावंत यांनी केले.
या कार्यशाळेत शिरगाव, रत्नागिरी येथील रत्नसागर शेतकरी उत्पादक कंपनीच्या सुमारे ५० महिला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यशाळेदरम्यान माशांचे आहारातील पोषणमूल्य यावर डॉ. आसिफ पागरकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच जवळा चटणी, कोलंबी लोणचे, कालवी लोणचे यांची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके श्रीमती अपूर्व सावंत, श्रीमती वर्षा सदावर्ते, डॉ. हरीश धमगाये, प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम यांनी सादर केली.
कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. केतन चौधरी यांनी प्रशिक्षणानंतर लघुस्तरावर व्यवसाय सुरू करून हळूहळू विस्तार करावा असा सल्ला दिला. सहभागी महिलांपैकी श्रीमती शिवलकर यांनी मनोगत व्यक्त करून प्रशिक्षणाबद्दल आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रज्ञान, रत्नागिरी येथील डॉ. राकेश जाधव, श्री सुशील कांबळे, श्री निलेश मिरजकर, श्री रोहित बुरटे, श्री प्रतिक यादव, श्री पंकज, श्री संदेश चव्हाण, श्री शुभम कांबळे तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.
महिला शेतकऱ्यांच्या आर्थिक सबलीकरणासाठी मत्स्य मूल्यवर्धन उद्योगाला चालना देणारी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरली.





