महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षणसायन्स & टेक्नॉलॉजी

वीर वाजेकर महाविद्यालयात हायड्रोपोनिक्स आणि किचन गार्डनिंग कार्यशाळा

उरण दि ६ (विठ्ठल ममताबादे ) : रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर आर्ट्स व कॉमर्स व सायन्स महाविद्यालयात वनस्पतिशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने ५ डिसेंबर २०२५ रोजी जागतिक मृदा दिन या निमित्ताने हायड्रोपोनिक्स आणि किचन गार्डनिंग विषयावर एक दिवसीय कार्यशाळा व प्रत्यक्ष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

कार्यशाळेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे भावना घाणेकर, सदस्य – महाविद्यालय विकास समिती यांच्या हस्ते करण्यात आले.त्यांनी विद्यार्थ्यांना हायड्रोपोनिक्स आणि किचन गार्डनिंग या क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच उद्योजकता कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा नवनवीन उपक्रमांचा उपयोग करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्र. प्राचार्य डॉ. आमोद ठाक्कर होते. त्यांनी शाश्वत शेती, हायड्रोपोनिक्स आणि शहरी किचन गार्डनिंग क्षेत्रातील उद्योजकतेच्या अफाट संधींवर प्रकाश टाकला. तसेच हायड्रोपोनिक्स शेती आजच्या प्रदूषणाच्या विळख्यात कशी गरजेची आहे आपल्या घरगुती वातावरणात आपण आपल्याला आवश्यक असलेला भाजीपाला वर्षभर कसा मिळवू शकतो याची माहिती दिली.तसेच हायड्रोपोनिक्स शेतीमध्ये अत्यंत कमी पाण्यामध्ये पीक घेता येत असल्याने जलसंवर्धनाचे सुद्धा उद्दिष्ट साधले जाते. हायड्रोपोनिक शेतीमध्ये खूप कमी वेळात पीक घेतले जाऊ शकते. किचन गार्डन ही संकल्पना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवून आपल्या घरात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याचा वापर करून फुलझाडे भाजीपाला सारखे उत्पन्न देणाऱ्या झाडांसाठी वापर केल्यास घनकचरा व्यवस्थापनामध्ये फार मोठा हातभार लागेल असे सांगितले.

तांत्रिक सत्राचे मार्गदर्शन  सूयोग कुलकर्णी (खेत आधार फाऊंडेशन) यांनी केले. त्यांनी हायड्रोपोनिक प्रणालीमध्ये वापरल्या जाणाऱ्या साधनांचे, तंत्रांचे आणि कार्यप्रणालीचे सविस्तर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देऊन विद्यार्थ्यांना आधुनिक माती विरहित शेतीचे प्रत्यक्ष ज्ञान मिळवून दिले.

उरण येथील कृषी अधिकारी  शुभम गटकळ आणि अक्षय राठोड यांनी देखील या कार्यशाळेत सहभाग घेतला आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधत अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले व त्याच्या प्रोत्साहनापर पंतप्रधान किसान योजना व राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ यांच्यामार्फत उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. एन. बी. पवार यांनी केले तर उपप्राचार्य प्रा. डॉ. अनिल पालवे यांनी कार्यक्रमास मार्गदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयन IQAC समन्वयक डॉ. राहुल पाटील यांनी केले.

महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच फुंडे, जासई आणि भागुबाई ठाकूर हायस्कूल मधील विद्यार्थी आणि शिक्षक यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवून या कौशल्याधारित प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button