शिक्षण संस्थेच्या आवारात हुतात्मा जवान स्मारक असण्याचे महत्त्व
- सदानंद भागवत (९४२२७००५३०, ७८२१०५३७१०)
शिक्षण संस्था चालक बंधू-भगिनी,
सप्रेम नमस्कार.
आपण शिक्षणासारख्या भावी पिढ्या घडविणाऱ्या पवित्र क्षेत्रामध्ये काम करत आहात त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. संस्था उत्तम रीतीने चालविण्यासाठी आपण घेत असलेले परिश्रम नक्कीच कौतुकास्पद आहेत.
शिक्षण संस्थेची जबाबदारी विद्यार्थ्यांना केवळ औपचारिक शिक्षण देणे एवढीच नाहीये तर विद्यार्थ्यांना, पालकांना आणि समाजाला देखील मूल्यशिक्षण व राष्ट्र विचार देणे ही सुद्धा तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे किंवा काकणभर जास्तच महत्त्वाची जबाबदारी आहे. कारण आपल्या पूर्वसुरींनी व आपण परिश्रमपूर्वक उभारलेल्या आणि सातत्याने विकास करत असलेल्या संस्थेतून शिकलेले विद्यार्थी पुढे जाऊन जर भ्रष्टाचारी अधिकारी किंवा व्यावसायिक बनत असतील तर हा शिक्षण संस्थांचा, समाजाचा आणि देशाचा पराभव आहे. या पराभवापासून देशाला वाचविण्याची जबाबदारी देखील शिक्षण संस्थांची आहे. या अनुषंगाने मी आपले लक्ष एका महत्त्वाच्या विषयाकडे वेधू इच्छितो.
प्रत्येक शैक्षणिक संस्थेमध्ये आदर्श निर्माण करणाऱ्या प्रतिमा लावण्यात येतात. यामध्ये राष्ट्रपुरुष, ऐतिहासिक व्यक्तिमत्वे, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, यशस्वी उद्योजक अशा थोर व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमांचा समावेश असतो. पण दुर्दैवाने आपल्या समाजामध्ये ती महान व्यक्ती कितीही थोर असली तरी तिला जातीमध्ये, विभागामध्ये, राज्यामध्ये, भाषेच्या बंधनामध्ये अडकवून ठेवले जाते, म्हणजे त्यांना एक प्रकारे संकुचित केले जाते किंवा त्यांचा कळत नकळत अपमान केला जातो. सुदैवाने या सगळ्या भेदभावाच्या पलीकडे जाऊन समाज कोणाचा विचार करत असेल तर तो म्हणजे आपल्या प्रिय देशाकरता धारातीर्थी पडलेल्या हुतात्मा जवानांचा. हुतात्मा जवानांच्या बाबतीत तो अमक्या जातीचा होता, तो आमच्या राज्याचा होता, तो तमक्या भाषेचा होता अशा प्रकारचा संकुचित विचार समाजाकडून केला जात नाही हे आपले भाग्य आहे.
त्यामुळे शिक्षण संस्थांनी राष्ट्रपुरुषांच्या किंवा ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या बरोबरच एक दालन विशेष करून निर्माण करायला पाहिजे ते म्हणजे शहीद जवान स्मारक. देशाच्या स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत हजारो शूर जवान हुतात्मा झाले आहेत. प्रत्येक शिक्षण संस्थेने आपल्या तालुक्यातील हुतात्मा जवानांसाठी संस्थेच्या आवारात एक दालन आवर्जून केले पाहिजे. असे स्मारक विद्यार्थी पालक व नागरिकांकरिता किती प्रेरणादायी होते याचा अनुभव मी आमच्या संस्थेमध्ये घेत आहे हे इथे अभिमानाने नमूद करतो. संस्थेच्या आवारात प्रवेश केल्या केल्या अशा प्रकारचे स्मारक असणे ही गोष्ट संस्था कोणती नितीमूल्ये जपते याचे प्रतिबिंब दाखवते. याचा सुपरिणाम असा होतो की संस्थेची विश्वासार्हता आपोआपच वाढते व संस्था कर्मचाऱ्यांबरोबरच संस्थाचालकांना व येणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना, नागरिकांना शुद्धता राखण्याची प्रेरणा मिळते.
शहीद स्मारक उभारण्याबरोबरच स्मारकाच्या माध्यमातून देशप्रेमाचा माहोल सतत तेवत ठेवावाही लागेल. यासाठी स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, शहीद दिन, कारगिल विजय दिवस किंवा त्या त्या हुतात्मा जवानांचे हौतात्म्य दिन श्रद्धांजली वाहून पाळणे, या अनुषंगाने प्रेरणादायी कार्यक्रम करणे ही जबाबदारी देखील संस्थेला घ्यायला लागेल.
– सदानंद भागवत
आम्हाला आमच्या संस्थेने उभारलेल्या शहीद जवान स्मारक व परमवीर चक्र दालन या प्रकल्पाच्या माध्यमातून खूप मोठी अनुभूती अनुभवायला मिळत आहे. संस्थेमधील वातावरण देशप्रेमाचे तर झालेच आहे पण या स्मारकाच्या माध्यमातून आपण शुद्धता पाळावी, देशासाठी काहीतरी त्याग करावा अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हायला मदत होत आहे. तालुक्यातील सर्व माजी सैनिक या संस्थेशी जोडले गेले आहेत व त्यामुळे मुलांमध्ये शिस्तीचे वातावरण देखील निर्माण झाले आहे. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर एक प्रकारचे नैतिक बंधन आले आहे व याचा एकूण परिणाम संस्थेची व त्या अनुषंगाने गावाची भरभराट होण्यामध्ये होत आहे.
अशा तऱ्हेने समाजमनाचा कायापालट करण्याचे सामर्थ्य हुतात्म्यांनी केलेल्या बलिदानामध्ये आहे व त्यांच्या प्रित्यर्थ केलेल्या स्मारकामध्ये आहे. ही अनुभूती घेतल्यामुळे मी आपणाला नम्र विनंती करेन की आपण संस्थाचालकांनी आपल्या संस्थेच्या आवारामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी तालुक्यातील हुतात्मा जवानांचे छोटेखानी का होईना स्मारक आवर्जून उभारावे. असे स्मारक संस्थेचे आवार देशप्रेमाने भारलेले बनवेलच, पण याचा दूरगामी परिणाम आपल्या भावी पिढ्यांचे आधारस्तंभ असलेल्या विद्यार्थ्यांवर फार मोठ्या प्रमाणात होईल व याची परिणती देश बलवान होण्यामध्ये होईल.
आपण सर्व संस्थाचालक संस्थेच्या आवारात शहीद जवान स्मारक उभारण्याचा साकल्याने विचार कराल अशी आशा करतो. मनःपूर्वक धन्यवाद.