संगमेश्वरचे प्रथितयश डॉ. वसंत श्रीनिवास मुळ्ये यांचे वृध्दापकाळाने निधन
संगमेश्वर दि. २९ : संगमेश्वर येथील जुन्या काळातील प्रथीतयश डॉक्टर वसंत श्रीनिवास मुळ्ये ( ९२ ) यांचे २९ सप्टेंबर रोजी पहाटे संगमेश्वर येथील निवासस्थानी निधन झाले. गेले काही दिवस ते वृध्दापकाळामुळे आजारी होते .
संगमेश्वरसह नायरी आणि संगमेश्वर परिसरातील गावांमध्ये डॉक्टर वसंत श्रीनिवास मुळ्ये यांनी जवळपास ६० वर्षांपेक्षा अधिककाळ वैद्यकीय सेवा दिली. ग्रामीण भागातून असंख्य रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी येत असत . आजार कितीही त्रासदायक असला तरीही त्यांच्याकडे उपचार घेतल्यानंतर रुग्णांना हमखास बरे वाटत असे असा त्यांचा नावलौकिक होता . संगमेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय येथेही त्यांनी १९५३ साली वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा दिली होती. संगमेश्वर बाजारपेठत त्यांनी अनेक वर्षे दवाखाना चालवला . तसेच संगमेश्वर येथेच धन्वंतरी या नावाने हॉस्पिटलही सुरु केले . पुढे महामार्गावरील हॉस्पिटल जवळचा बसथांबा ‘ मुळ्ये स्टॉप ‘ याच नावाने ओळखला जावू लागला.
आध्यात्मिक, कमालीचे अभ्यासू, वाचनाची जबरदस्त आवड , स्पष्ट वक्ते , रोगाचे अचूक परीक्षण अशी अनेक वैशिष्ट्ये त्यांच्या मध्ये दडलेली होती . डॉक्टर वसंत श्रीनिवास मुळ्ये यांच्या निर्मलचंद्र या मुलाने अमेरिकेत जावून नावलौकिक मिळवला तर सुशिल याने एम.एस. होत संगमेश्वर, लांजा आणि रत्नागिरी येथे मोठी रुग्णालये उभारुन वैद्यकीय व्यवसायाचा विस्तार केला. डॉक्टर सुशील यांच्या पत्नी सौ. मीरा या देखील डॉक्टर असून आता त्यांची कन्या पूर्वा ही देखील एम .बी .बी. एस .झाली आहे . डॉक्टर सुशील हे आपल्या वडिलांचा वैद्यकीय सेवेचा वारसा पुढे चालवीत आहेत.
डॉक्टर वसंत श्रीनिवास मुळ्ये ( ९२ ) हे गेले काही दिवस वृध्दापकाळाने आजारी होते . गेले दोन दिवस त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि आज पहाटे २ : ३० च्या दरम्याने त्यांचे निधन झाले . डॉक्टर वसंत श्रीनिवास यांचे मूळ गाव उजगाव येथील खोत म्हणून त्यांच्यावर गावची जबाबदारी होती . त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच उजगावसह संगमेश्वर परिसरातील असंख्य मंडळी , विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. डॉक्टर वसंत मुळ्ये यांच्यावर माभळे येथील स्मशानभूमीत आज सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांच्या पश्चात निसर्गोपचार तज्ञ पत्नी सुमित्रा, तीन मुलगे, दोन मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.