संगमेश्वरातील खाडीपट्ट्यात बेकायदा वाळू उपसा सुरु
संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील खाडी भागात गेले काही दिवस राजरोसपणे अनधिकृत वाळु उत्खनन सुरु असून रात्रीच्या वेळी या वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक सुरु आहे. हे सर्व डोळ्यादेखत दिसत असतानाही तालुका महसूल विभाग याबाबत गप्प का, असा सवाल पर्यावरण प्रेमीनी उपस्थित केला आहे. सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे. अधिकारी वर्ग सध्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या कामात व्यस्त असल्याचा लाभ उठवत हा चोरटा वाळू उपसा सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे .
संगमेश्वर तालुक्यात डिंगणी ते करजुवे असा विस्तीर्ण खाडी भाग पसरला आहे. तालुक्याच्या एका टोकाला असल्याने या भागात राजरोसपणे सुरु असलेले अवैध वाळु उत्खनन सध्या कुणाच्या आशिर्वादाने सुरु आहे असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. गेले आठ दिवस करजुवे येथे सक्षन पंपाने बेसुमार वाळू उत्खनन सुरु केले आहे. या सर्वाना येथील स्थानिक पुढारी याकामी साथ देत असल्याची चर्चा आहे. या पुढाऱ्यानेही पार्टनरशिप मधे आपला व्यवसाय सुरु केल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील खाडी भागात सुरु असलेल्या या उत्खनन केलेल्या वाळुची चोरटी वाहतूक रात्री १२ नंतर सुरु असून संगमेश्वर – देवरुख मार्गावरून हे डंपर कोल्हापूरच्या दिशेने जाताना दिसत आहेत. एका रात्रीत १५ ते २० डंपर वाळु पर जिल्ह्यात जात असल्याने या भागात किती मोठ्या प्रमाणात वाळु उत्खनन सुरु आहे याचा पुरावा असतानाही महसूल विभाग याकडे का दुर्लक्ष करत आहे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महसूल विभागातील काही अधिकार्यांनी अर्थपूर्ण व्यवहार केल्याची चर्चा तालुक्यात सुरु असुन यातूनच संगमेश्वर तालुक्यात अनधिकृत वाळु उत्खननाला जोर आल्याचे बोलले जात आहे.
गेल्या वर्षी तसेच यावर्षीच्या सुरुवातीला भरारी पथकाद्वारे वाळु वाहतूक करणाऱ्या ट्रक वर कारवाई करण्याचा सपाटा महसूल विभागाने लावला होता. आता ही पथके कुठे गेली असा सवाल पर्यावरण प्रेमीनी उपस्थित केला आहे.
तालुक्यात सुरु असलेल्या अवैध वाळु उत्खननावर कारवाई झाली नाही तर याविरोधात कोकण आयुक्त तसेच पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.