सरपंचांच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी महायुती सरकार कटीबद्ध : ना. उदय सामंत

सांगली : सरपंच हे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेचा पाया असून त्यांच्या परवानगीशिवाय गावाच्या विकासाची कोणतीही योजना साकार होऊ शकत नाही. समाजात सरपंचांना असलेलं महत्त्वाचं स्थान अधोरेखित करताना, त्यांच्या विविध मागण्यांचा विचार करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सरपंचांना दिला.
सांगलीतील अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या सरपंच संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सरपंचांना शुभेच्छा देताना, आपल्या माध्यमातून भविष्यात विधानसभेवर अनेक सरपंच आमदार म्हणून चमकतील, अशी अपेक्षा ना. सामंत यांनी व्यक्त केली.
सरपंचांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी लवकरच विशेष बैठक आयोजित केली जाईल आणि त्यांच्या मागण्या सोडवण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
या मेळाव्यात आमदार सुहास बाबर, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सरपंच परिषद अध्यक्ष जयंत पाटील, प्रदीप माने तसेच विविध गावांचे सरपंच व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.