सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नागिरी’तर्फे वेतोशी येथे ‘राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन’ कार्यक्रम
रत्नागिरी : भारतातील मत्स्य उत्पादकांसाठी १० जुलै १९५७ हा एक संस्मरणीय दिवस आहे. या दिवशी शास्त्रज्ञ डॉ. हिरालाल चौधरी यांनी डॉ. अलीकुन्ही यांच्या सहकार्याने भारतीय प्रमुख कार्प माशांच्या प्रेरित प्रजननात पहिले यश संपादन केले होते. दिनांक १० जुलै या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन भारत सरकारने २००१ मध्ये १० जुलै हा ‘राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन’ म्हणून घोषित केला आहे.
‘राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस’ संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून यंदाचे हे २४ वे वर्ष आहे. या वर्षी देखील हा दिवस मोठ्या उत्साहात ‘डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली’ अंतर्गत झाडगांव, रत्नागिरी येथे असलेले ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र’ मार्फत साजरा करण्यात आला. राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाचे औचित्य साधुन सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी यांच्या कडून प्रातिनाधिक स्वरूपामध्ये मत्स्य शेतकऱ्यांचा सत्कार केला जातो.
वेतोशी, रत्नागिरी येथील प्रगतशील मत्स्यशेतकरी श्री. अशोक साळुंखे, यांनी शिवार अॅग्रो टुरिझम हा प्रकल्प एकात्मिक शेती आणि पर्यटन केंद्र म्हणून विकसित करीत आहेत. त्यांनी येथे आंबा, काजू, नारळ, ड्रगन फ्रुट अशा फळझाड लागवड बरोबरच भात शेती, नाचणी शेती, भाजीपाला, गाय तसेच बकरी पालन, गांडुळ खात प्रकल्प, कुक्कुटपालन असे विविध शेतीचे जोडधंदे वर्षभर ऋतुचक्र नुसार करीत आहेत. सोबतच त्यांनी शेत-तळ्यातील मत्स्यसंवर्धन आणि गोड्या पाण्यातील खेकडा संवर्धन असे प्रकल्प यशस्वी राबविले आहेत. या त्यांच्या कार्याची दाखल घेवून महाराष्ट्र शासनाने गेल्यावर्षी (२०२३ साली) त्यांचा मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रगतशील शेतकरी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले होते.
दि. १० जुलै २०२४ रोजी ‘राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाचे’ औचित्य साधुन ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र’ रत्नागिरी येथील सर्व शास्त्रज्ञानी वेतोशी येथे प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर जावून श्री. अशोक साळुंखे यांना भविष्यातील कामगिरीस प्रोत्साहन व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरीचे वरीष्ठ वैज्ञानिक अधिकारी आणि प्रमुख डॉ. सुरेश नाईक यांचे हस्ते ‘पुष्पगुच्छ’ देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन अधिकारी डॉ. आसिफ पागरकर, अभिरक्षक डॉ. हरिष धमगये, सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम, वाहनचालक श्री. मुकुंद देऊरकर आणि मजूर श्री. योगेश पिलणकर हे उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरीता डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे आदरणीय कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. पराग हळदणकर आणि संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.