सावंतवाडी-दिवा एक्सप्रेसला एसी कोच आले आणि अर्ध्या तासात भरलेही!

गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या गणेश भक्तांच्या गर्दीचा परिणाम
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर रोज धावणाऱ्या सावंतवाडी दिवा एक्सप्रेसचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी रेल्वेने या गाडीला इकॉनॉमी थ्री टायर एसीचे दोन डबे जोडले आहेत. गुरुवारी सकाळी ८ वाजता या या गाडीच्या एसी कोचसाठी बुकिंग सुरू झाले आणि आश्चर्य म्हणजे पुढच्या अर्ध्या तासातच जाता येतानाचे मिळून सहा दिवसांसाठी बुकिंग फुल्ल देखील झाले. यावरून या गाडीला वातानुकूलित डबे जोडण्याची किती गरज होती, हे अधोरेखित झाले आहे.
कोकण रेल्वने सावंतवाडी ते दिवा (10106/5) मार्गावर रोज धावणाऱ्या एक्सप्रेसला वातानुकूलित थ्री टायर दर्जाचे दोन डबे दिनांक 15 सप्टेंबरपासून जोडण्याचा निर्णय घेतला आहे. एका महिन्याच्या तात्पुरत्या कालावधीसाठी रेल्वेकडून हा प्रयोग केला जात आहे. आज गुरुवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी सावंतवाडी दिवा एक्सप्रेसला जोडलेल्या दोन डब्यांचे आरक्षण रेल्वेच्या आरक्षण प्रणालीवर सुरू झाले आणि पुढच्या अर्ध्या तासात डाऊनच्या चार फेऱ्यांचे तर अप दिशेने येणाऱ्या दोन फेऱ्यांचे बुकिंग फुल्ल होऊन प्रतीक्षा यादीवरील बुकिंग सुरू झाले आहे.
सावंतवाडी ते दिवा मार्गावर रोज धावणाऱ्या या गाडीला इकॉनॉमी श्रेणीचे थ्री टायरचे दोन डबे जोडल्यामुळे या गाडीतून आता प्रथमच ए सी कोचमध्ये बसून प्रवास करता येणार आहे. यामुळे ‘सिंधुदुर्ग एक्सप्रेस’ या नावाने धावणाऱ्या या गाडीचा प्रवास अधिक सुखदायक होणार आहे.