हाकलला तरी बिबट्या यायचा पुन्हा पुन्हा गोठ्यात!

ओवळी येथे वन विभागाने पिंजरा लावून केले जेरबंद
चिपळूण : तालुक्यातील मौजे ओवळी बौध्दवाडी येथे गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राणी बिबट्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते. मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी यशस्वी सापळा रचून हा बिबट्या अखेर ११ जुलै रोजी रात्री जेरबंद केला. या संपूर्ण बचाव कार्यात वनविभागासोबत स्थानिक ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
दिनांक ६ जुलै २०२५ पासून श्री. विलास मोहिते यांच्या गोठ्यात बिबट्या नियमितपणे येत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ वनविभागास माहिती दिली. यानंतर वनपाल श्री. एस. एस. सावंत (चिपळूण), वनरक्षक श्री. कृष्णा इरमले (कोळकेवाडी) आणि श्री. राहुल गुंठे (रामपूर) यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणीत बिबट्या प्रत्यक्षात गोठ्यात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर काही वेळासाठी त्याला पळवून लावण्यात यश आले, मात्र वातावरण शांत होताच बिबट्या पुन्हा गोठ्याकडे परत येत होता. पुनःपुन्हा होत असलेल्या या घटनेमुळे वनविभागाने ट्रॅप कॅमेरे आणि पिंजरे लावले. मात्र बिबट्या पिंजऱ्याकडे न जाता पुन्हा गोठ्यातच येत बसू लागला. वनविभागाने बिबट्याची तब्येत पाहणी केली असता तो अशक्त व आजारी असल्याचे आढळून आले. त्यामुळे अधिक नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
११ जुलै रोजी मा. श्रीम. गिरिजा देसाई, विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) यांच्या सूचनेनुसार मा. श्रीम. प्रियंका लगड, सहाय्यक वनसंरक्षक (चिपळूण) यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पिंजऱ्याची जागा बदलली. श्री. मोहिते यांच्या गोठ्यातच ट्रॅप पिंजरा लावून भक्ष ठेवण्यात आले. त्या रात्री ८.३० वाजता बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला. सदर बिबट्याची वैद्यकीय पाहणी करण्यात आली असता तो नर जातीचा असून अंदाजे चार ते पाच वर्षांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या मानेवर जखमही आढळून आली. त्यामुळे श्रीम. गिरिजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या जखमी बिबट्याला तत्काळ पुणे येथील रेस्क्यू ट्रान्सीट ट्रीटमेंट सेंटरमध्ये उपचारासाठी वनविभागाच्या अँब्युलन्सने पाठवण्यात आले.
या संपूर्ण बचाव मोहिमेत गिरिजा देसाई (विभागीय वन अधिकारी), प्रियंका लगड (सहाय्यक वनसंरक्षक), आर. एस. परदेशी (वन परिक्षेत्र अधिकारी), एस. एस. सावंत (वनपाल), सुरेश उपरे (वनपाल, सावर्डे), श्री. कृष्णा इरमले (वनरक्षक, कोळकेवाडी), श्री. राहुल गुंठे (वनरक्षक, रामपूर), तसेच श्री. नंदकुमार कदम (वाहन चालक) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीशिवाय हे कार्य अशक्य होते. पोलिस पाटील श्री. अजिंक्य शिंदे, तसेच ग्रामस्थ शुभम रवींद्र शिंदे, वेदांत प्रकाश शिंदे, उदय शिवाजी कदम, दशरथ रामचंद्र शिंदे, सुजल प्रफुल शिंदे, आर्यन संतोष घाग, सुजल राजेश शिंदे, धावू कानू शेळके, मुंकुद सुरेश हिलम, संदीप सावंत आणि गोटा मालक श्री. विलास शिंदे व श्री. सुरेश शिंदे यांनी या संपूर्ण मोहिमेत सतत सहकार्य केले.