ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीय

हिंदूंना हिंसक ठरवणाऱ्या राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करून कठोर कायदेशीर कारवाई करा

रत्नागिरीतील हिंदुत्ववादी संघटनांची निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींकडे मागणी

रत्नागिरी : काँग्रसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेष निर्माण करणारे, असे संबोधले. त्यामुळे जगभरात सहिष्णू हिंदू समाजाची नाहक बदनामी झाली. देशभरातील कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या. हिंदूंना हिंसक ठरवणाऱ्या राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रत्नागिरीतील हिंदुत्ववादी संघटनांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या नावे आज जिल्हाधिकारी देवेंदरसिंह यांना देण्यात आले.

निवेदन देताना विश्व हिंदू परिषदेच्या सौ. संपदा जोशी, सौ. स्नेहा ढालकर, सौ. अस्मिता सरदेसाई, सौ. संचिता बापट, बजरंगदलाचे श्री. विराज चव्हाण, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख श्री. गणेश गायकवाड, शिवचरित्र कथाकार श्री. अरविंद बारस्कर, हिंदू जनजागृती समितीचे सर्वश्री तन्मय जाधव, विष्णू बगाडे, शिवप्रसाद धुपकर आणि संजय जोशी हे उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी काँग्रेस भगवा दहशतवाद किंवा हिंदू दहशतवाद संकल्पना मांडण्याचा प्रयत्न करून नेहमीच जागतिक पातळीवर हिंदू समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आली आहे. राहुल गांधी यांचे मंदिरांना भेट देणे आणि हातावर पवित्र धागा बांधणे ही शुद्ध फसवणूक होती, हे सिद्ध झाले आहे.
वर्ष १९९० च्या दशकात काश्मीरी हिंदूंना काश्मीरमधून कोणी विस्थापित केले ? ‘सर तन से जुदा’चा फतवा काढून देशभर अनेक हिंदूंचे गळे कापणारे कोण होते ? मणिपूरमध्ये हजारो सहिष्णु मतैई समाजावर आक्रमण करून त्यांना विस्थापित करणारे कोण होते, हे राहूल गांधी कधी का सांगत नाहीत ? वर्षभरात श्रीरामनवमी, हनुमान जयंती, नवरात्री, महाशिवरात्री, हिंदू नववर्ष आदी हिंदू सणांच्या वेळी दगडफेक करणारे, हिंदूंना ठार मारणारे, देवतांच्या मूर्त्या फोडणारे कोण होते, यावर राहूल गांधी कधी का बोलत नाहीत ? संपूर्ण विश्व जिहादी आतंकवादाने त्रस्त आहे, लाखो लोक मारले गेले आहेत, पण या दहशतवादाचा रंग कोणता, हे राहूल गांधी यांनी कधी सांगितलेले नाही.
सर्वांत प्राचीन असलेला हिंदु धर्म हा सहिष्णु असल्यामुळे त्याने अन्य पंथीयांप्रमाणे कधी साम्राज्य विस्तारासाठी अथवा धर्मपरिवर्तनासाठी इतरांवर आक्रमण केले नाही. उलट जगात हिंदू समाज आज सार्वत्रिक शांतता आणि कल्याणाच्या विचारधारेसाठी ओळखला जातो, ‘वसुधैव कुटुंबकम’ किंवा ‘संपूर्ण जग एक कुटुंब’ या तत्त्वाचे प्रतिनिधित्व करतो. या समाजाला हिंसक, खोटारडा, द्वेष्टा किंवा दहशतवादी म्हणून लेबल लावणे, ही त्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आहे.
एका राष्ट्रीय पातळीवरील नेत्याकडून करण्यात आलेले हे विधान अत्यंत अनुचित व समाजात फूट पाडणारे आहे. लोकसभेत ‘लोकसभा सदस्यत्वा’ची शपथ घेतांना सर्वांशी समभावाने वागण्याची जी शपथ घेतली जाते. त्या शपथेचा राहूल गांधी यांनी उडपपणे भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. समाजात भेद, द्वेष निर्माण करणाऱ्यांना अशा लोकांना निवडणूक लढवण्यासाठी कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button