हिंदू म्हणून एकत्र या, भगव्याची ताकद अवघ्या जगाला दाखवा : नीलेश राणे
संगमेश्वरातील कसबा येथील धर्मरक्षण मेळाव्यात आवाहन
रत्नागिरी : ज्या धर्मवीर संभाजी महाराजांनी वयाच्या ३२ व्या वर्षी धर्मासाठी आपल्या प्राणांचे बलिदान केले त्यांचा आदर्श आयुष्यभर जपा. तुमचा धर्म अडचणीत आहे, जेव्हा धर्म हाक मारेल तेव्हा हिंदू म्हणून एकत्र या आणि या भगव्याची ताकद अवघ्या जगाला दाखवून द्या, अशा प्रेरक शब्दात माजी खासदार नीलेश राणे यांनी कसबा येथील धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत धर्म रक्षण मेळाव्यात उपस्थिताना संबोधित करताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
नीलेश राणे म्हणाले, आपण आपला धर्म जगत असतो, धर्मवीर संभाजी महाराज सुद्धा हिंदू म्हणून जगले आणि हिंदू म्हणूनच प्राणांची त्यांनी आहुती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा महापराक्रमी पुत्र असूनही केवळ समाज गाफील राहिला म्हणून शत्रूच्या हाती फंदफितुरीने सापडला, अनन्वित हाल सोसले, आधी बोटे, हात, पाय, डोळे आणि मग प्राणांचीही आहुती दिली पण आपला धर्म सोडला नाही. आपण शिवप्रेमी, शंभूप्रेमि आहोंत. आपण जिवंत असेपर्यंत त्यांचे देणे लागतो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला कस जगावं हे शिकवलं तर छत्रपती संभाजी महाराजांनी कसं मरावं हे आपल्याला शिकवलं आहे. तेच राजे आपले आदर्श आहेत.
आपल्या धर्माची आठवण करून देत हिंदू रक्षण दिन उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल प्रमोद जठार, प्रमोद अधटराव आणि सहकार्याचे कौतुकच करावे लागेल. हा उपक्रम देशपातळीवर पोहोचला पाहिजे, याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे.
– नीलेश राणे, माजी खासदार, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ.
त्यामुळे आताही आपला धर्म अडचणीत असताना, चारी बाजूने घेरला जात असताना धर्मासाठी वयाच्या ३२ व्या वर्षी प्राणांचे त्याग करणाऱ्या धर्मवीर संभाजी महाराजांचा बलिदान दिन हा केवळ धर्म रक्षण दिवस उपक्रम म्हणून विसरून जाऊ नका. आजचा समाज, आजचा तरुण कुठल्या दिशेने जातोय हे दररोज आपण बघतोय, वाचतोय. अशावेळी गाफील होऊन चालणार नाही तर आता आपण हिंदू म्हणून एकत्र झालं पाहिजे. आपला धर्म आपल्याला नेहमी हाक मारत असतो. अशावेळी डोळे बंद करू नका, आपला संबंध नाही म्हणून दुर्लक्ष करू नका, हिंदू म्हणून एकत्र या. आता हिंदूंची ताकद दाखवून दिली पाहिजे, भगव्याची ताकद सगळ्या जगाला दाखवली पाहिजे असे निलेश राणे म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी तत्काळ १० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्याबद्दल त्यांचे निश्चितच आभार. पण या भूमीत महाराजांचे भव्य स्मारक झाले पाहिजे. त्यांच्या धर्मरक्षणाच्या त्यागाची आठवण पुढच्या पिढीनेही ठेवली पाहिजे, यासाठी शासने ५०० कोटी रुपये या स्मारकाला घोषित करावे, अशी मागणी केली तर ज्या शिंदे- फडणवीस सरकारमध्ये आपण आपले सण पुन्हा साजरे करू शकलो त्यांच्याच काळात हे स्मारक मार्गी लागेल, असा विश्वास सुद्धा निलेश राणे यांनी व्यक्त केला.