‘हे माझे झाड’ संकल्पनेवर शनिवारी व्हेळ येथे वृक्षमहोत्सव
लांजा : मुंबईतील राजापूर-लांजा तालुका नागरिक संघातर्फे हे माझे झाड या संकल्पनेवर आधारित वृक्षमहोत्सव येत्या शनिवारी (दि. १० ऑगस्ट) व्हेळ (ता. लांजा) येथे आयोजित करण्यात आला आहे.
राजापूर तालुक्यातील वाटूळ ते संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे रस्त्यावर व्हेळ-विलवडे या भागात रस्त्याच्या दुतर्फा वड, पिंपळ, उंबर, चिंच आणि काजरा या स्थानिक वृक्षांच्या पाचशे रोपांची लागवड करण्यात येणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी महामार्गावरील जुनी लाखो झाडे तोडण्यात आली. महामार्गाच्या दुतर्फा लागवड करण्याचा दंडक घालण्यात आला असला, तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. मात्र वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. ती भरून काढण्याचा प्रयत्न म्हणून वृक्षमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
ही रोपे लावल्यानंतर त्यांच्या निगराणीची आणि जोपासनेची व्यवस्थाही संघामार्फत केली जाणार आहे. त्यामध्ये
परिसरातील शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे एका झाडाची जबाबदारी देण्यात येणार असून पुढील काही वर्षे त्या विद्यार्थ्याने झाडाची जोपासना करावी, अशी अपेक्षा आहे. यासाठीच हे माझे झाड ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.
व्हेळ येथील रुक्मिणी भास्कर विद्यालयात १० ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत रोपे लावण्याचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने या वृक्षलागवडीचे प्रायोजकत्व स्वीकारले असून वृक्षमहोत्सवामध्ये विविध संस्थाही सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहून झाडे लावणाऱ्या आणि भविष्यात त्यांची जोपासना करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे सरचिटणीस प्रमोद पवार यांनी केले आहे.